(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मॅच दक्षिण आफ्रिक-श्रीलंकेत पण टेन्शन ऑस्ट्रेलियाला, भारत मात्र जोमात, WTCचा पॉइंट टेबलमध्ये कोणाचा गेम करणार?
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या भारतीय संघासाठी आता डर्बनमधून आनंदाची बातमी येत आहे.
WTC 2025 Final Scenario : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या भारतीय संघासाठी आता डर्बनमधून आनंदाची बातमी येत आहे. यजमान संघ दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना बुधवारपासून डर्बनया शहरात सुरू झाला आहे. पण या सामन्याच्या पहिल्या सत्रातच मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वेळेआधी जेवणाचा ब्रेक घ्यावा लागला. यानंतर पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि अखेर दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित करावे लागले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 बाद 80 अशी होती.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा यजमान कर्णधार टेंबा बावुमा 28 धावांवर नाबाद होता. त्याला काईल वॉरनने 9 धावा करत साथ दिली. याआधी आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम 9 धावा करून बाद झाला, तर टोनी डी जॉर्ज 4 धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स 16 आणि डेव्हिड बेडिंगहॅम 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. लाहिरू कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या 4 पैकी 2 फलंदाजांना बाद केले. विश्वा फर्नांडो आणि असिथ फर्नांडो यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यातील पावसाचा भारत आणि ऑस्ट्रेलियाला काय फायदा?
खरंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या शर्यतीत फक्त तीन संघ आहेत. हे तीन संघ दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड आहेत. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात डर्बनमध्ये दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो ऑस्ट्रेलियाला मागे टाकेल आणि WTC गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर येईल. मात्र हा सामना अनिर्णित राहिला तर असे होणार नाही. डर्बन कसोटी अनिर्णित राहिल्यास श्रीलंका तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरेल. याचा फायदा न्यूझीलंडला होईल, तो चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर राहील.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, ते 61.11 टक्के गुणांसह WTC पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (57.69) दुसऱ्या, श्रीलंका (55.56) तिसऱ्या, न्यूझीलंड (54.55) चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका (54.17) पाचव्या स्थानावर आहे. WTC पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.
टॉप-2 मध्ये राहण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियात किमान 3 कसोटी जिंकणे आणि एक ड्रॉ करणे आवश्यक आहे, परंतु जर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्याचा थेट फायदा होईल. अशा स्थितीत डर्बनमधील पावसाने या तिन्ही संघांना कुठे तरी आनंद बातमी दिली आहे. पण श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांना हा सामना अनिर्णित राहावा असे अजिबात वाटणार नाही.