गंभीरची एन्ट्री अन् श्रेयस अय्यरला लॉटरी, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात संधी!
Shreyas Iyer : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघामध्ये मराठमोळ्या श्रेयस अय्यर याचं कमबॅक झालेय.
Shreyas Iyer : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघामध्ये मराठमोळ्या श्रेयस अय्यर याचं कमबॅक झालेय. श्रेयस अय्यर याला वनडेच्या संघात स्थान देण्यात आले आहे. 2 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे, त्यासाठी आज निवड समितीने टीम इंडियाची निवड केली. त्यामध्ये श्रेयस अय्यर याला स्थान देण्यात आले आहे. 2023 वनडे विश्वचषकानंतर श्रेयस अय्यर यानं संघातील स्थान गमावले होते. आता त्याचं कमबॅक झाले आहे.
सहा महिन्यापासून श्रेयस अय्यर टीम इंडियातून बाहेर आहे. मायदेशात झालेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत अय्यर अखेरचा खेळला होता. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे त्याचं संघातील स्थान गेलं होतं. त्याच वेळी बीसीसीआयनं त्याच्यावर कडक कारवाईही केली होती. देशातंर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याचा ठपका ठेवत श्रेयस अय्यर याला वार्षिक करारातून वगळण्यात आले होते. पण आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्त झाला अन् श्रेयस अय्यरचं नशीब पुन्हा फळफळलं. श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांच्यातील नातं खूप चांगलं आहे. दोघांनी कोलकातासाठी एकत्र काम केलेय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकात्यानं 2024 च्या आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळी गौतम गंभीर संघाचा मेंटॉर होता. अय्यर आणि गौतम यांच्यातील ट्युनिंग चांगलं होतं. त्यामुळेच कदाचीत अय्यरसाठी टीम इंडियाचं दारं पुन्हा उघडली आहेत.
श्रीलंका दौऱ्यात श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. त्यासोबत मिळालेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर याच्यासोबत बीसीसीआय वार्षिक करार पुन्हा करणार असल्याचेही समोर आले आहे. अय्यरने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. पण त्या दौऱ्यात तो फक्त एक वनडे सामना खेळला होता. त्यामध्ये त्याने 52 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्यानं संघातील स्थान गमावलं होतं. भारतात झालेल्या 2023 वनडे विश्वचषकात श्रेयस अय्यर यानं शानदार कामगिरी केली होती. त्यानं 500 पेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. अय्यरच्या फलंदाजीचे सर्वांनीच त्यावेळी कौतुक केलं होतं. विश्वचषकात सर्वाधिक धावा कऱणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता.
श्रेयस अय्यरने आतापर्यंत 59 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 2383 धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये पाच शतके आणि 23 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वच्च धावसंख्या 128 इतकी आहे. अयय्रने भारतासाठी 51 टी20 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. त्यामध्ये त्याने 8 अर्धशतकाच्या मदतीने 1104 धावांचा पाऊस पाडलाय. दरम्यान, श्रेयस अय्यरने श्रीलंकाविरोधात सात वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 338 धावा केल्या आहेत. त्यामध्ये तीन अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 88 इतकी आहे.