IND vs AUS: श्रेयस अय्यर नागपूर कसोटी सामन्यातून बाहेर, 'या' खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता
Team india: श्रेयस अय्यरला नागपूर कसोटी सामन्यातून अनफिट असल्यामुळे वगळण्यात आलं आहे. ज्यामुळे त्याच्या जागी मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.
IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात आता कसोटी मालिका सुरु होणार आहे. नागपुरात सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. फलंदाज श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केलं पण पाठीच्या त्रासामुळे त्याला पुन्हा बाहेर पडावं लागलं आहे.तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
आता त्याला पहिल्या कसोटीतून बाहेर बसावं लागलं तर संघात त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघाच्या एका सूत्रानं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या निवेदनात सांगितलं की, 'श्रेयसची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही आणि त्याला बरे होण्यासाठी किमान 2आठवडे लागतील. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं असून दुसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय फिटनेस अहवालाच्या आधारे घेतला जाईल.'
बीसीसीआयनं अद्याप घोषणा केलेली नाही
श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप त्याच्या जागी कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी घोषित केलेल्या संघात अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या रूपाने भारतीय संघाकडे 2 पर्याय आहेत.
याशिवाय या वर्षी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवणाऱ्या शुभमन गिलच्या रूपानेही संघाकडे एक पर्याय आहे. जिथे कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला खेळण्याची अपेक्षा आहे, तिथे संघ गिलला मधल्या फळीत खेळण्याची संधी देऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (अनफिट), केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्मशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-