Sarfaraz Khan : सध्या रणजी क्रिकेट ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु असून यामध्ये मुंबई संघाकडून फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. सध्या सुरु मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यातही त्यानं शतक झळकावत एकहाती मुंबईचा डाव सावरला. पण असं असूनही अद्याप त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. दरम्यान सरफराजचं हेच दु:ख कुठेतरी मुंबईचा कोच आणि माजी रणजी खेळाडू अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याने ओळखलं आहे. त्यामुळेच सरफारजच्या शतकानंतर अमोलनं त्याला हॅट्स ऑफ करत अभिवादन केलं. विशेष म्हणजे अमोल मुझुमदार हा तोच खेळाडू आहे, ज्याने देशांतर्गत क्रिकेट कमालीचं गाजवत तब्बल 11 हजारांहून अधिक धावा करुनही अखेपर्यंत त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे कुठेतरी सरफारजसोबत आता जे घडत आहे, त्याची जाणीव अमोलला होत असावी असं दिसून येत आहे.


बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसआयनं (BCCI) निवडलेल्या या संघात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने (Sarfaraz Khan) याला संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील गेल्या तीन हंगामात सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही सरफारजला संधी न मिळाल्याने नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर टीक केली होती. दरम्यान आता त्याने आणखी एक शतक ठोकत बीसीसीआयच्या निवडसमितीला विचार करायला भाग पाडलं आहे.

 

पाहा VIDEO-





 

अमोल मुझूमदारला अखेपर्यंत संधी मिळाली नाही

 

दरम्यान सरफराजच्या शतकानंतर त्याला अभिवादन करणारा मुंबईचा कोच अमोल मुझूमदार याचीही कहाणी कुठेतरी अशीच आहे. 90 च्या दशकापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी अमोलने केली होती. 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली पण तोवर तो एकदाही भारतीय संघात कोणत्याच क्रिकेट प्रकारात सामना खेळू शकला नाही. अमोलच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला. त्याने आपल्या कारकिर्दीत 171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.13 च्या सरासरीने 11,167 धावा केल्या. त्याच्या नावावर 30 शतकं, 60 अर्धशतकं आहेत. निवृत्तीनंतर ते एनसीएमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत अमोल आता मुंबई रणजी संघाचा कोच आहे. पण 11 हजारांहून अधिक धावा प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये करुन एकही सामना भारताकडून त्याला खेळता आला नाही. दरम्यान आता सरफराज मागील तीन हंगामापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. खानने आतापर्यंत 36 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 52 डावांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी 80.47 आहे. यादरम्यान त्याने एकूण 12 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने एक त्रिशतकही ठोकले आहे. गेल्या तीन हंगामापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतच आहेत. त्याने 2019-20 मध्ये 155 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर, 2021-22 मध्ये, त्याने पुन्हा एकदा 123 च्या सरासरीने 900 हून अधिक धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही तो दमदार खेळी करत आहे. पण असं असूनही त्यालाही संधी मिळत नसल्याने अनेकांना मुझूमदार आठवू लागल आहे. त्यात आता मुझूमदारनेही सरफराजच्या शतकावर दिलेल्या रिएक्शनने अनेकांना भावनिक व्हायला झालं आहे.दरम्यान सरफराज सध्या 25 वर्षांचाच असून त्याला अजून बरच क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळे त्याला वेळीच संधी मिळावी आणि त्याचा अमोल मुझूमदार होऊ नये अशी प्रार्थना क्रिकेट फॅन्स करत आहेत. 

 

हे देखील वाचा-