बापाच्या अश्रूचं सोनं केलं, सरफराजने करुन दाखवलं, पहिल्याच सामन्यात खणखणीत अर्धशतक
रवींद्र जाडेजाच्या साथीला आलेला सरफारज खानने वन डे स्टाईल अर्धशतक झळकावलं. तर दुसरीकडे सर रवींद्र जाडेजानेही घरच्या मैदानात अर्धशतकी वाटचाल केली. सरफराजने अवघ्या 48 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले.
राजकोट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने (Sarfaraj Khan) अर्धशतकी सलामी दिली. एकीकडे कर्णधार रोहित शर्मा धडाकेबाज शतक ठोकून परतल्यानंतर, रवींद्र जाडेजाच्या साथीला आलेला सरफारज खानने वन डे स्टाईल अर्धशतक झळकावलं. तर दुसरीकडे सर रवींद्र जाडेजानेही घरच्या मैदानात अर्धशतकी वाटचाल केली. सरफराजने अवघ्या 48 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले.
सरफराजच्या वन डे स्टाईल अर्धशतकाने प्रेक्षक गॅलरीत बसलेले वडील आणि पत्नीचा उर अभिमानाने भरून आला. सरफराज खानच्या पदार्पणाने बापाच्या डोळ्याच्या कडा आनंदाने ओल्या झालेलं संपूर्ण देशाने आजच सकाळी पाहिलं होतं. त्याच बापाच्या अश्रूचं सोनं सरफराजने अर्धशतकाने केलं. एकीकडे रवींद्र जाडेजा शतकाकडे वाटचाल करत असाताना, सरफराज खानने आल्या आल्या धुलाईला सुरुवात केलं. रवींद्र जाडेजाने जेमतेम 8-10 धावा केल्या असतील, तोपर्यंत सरफराज खानने चौकार-षटकार लगावून अर्धशतक पूर्ण केलं.
In No Time!
— BCCI (@BCCI) February 15, 2024
5⃣0⃣ on Test debut for Sarfaraz Khan 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/F5yTN44efL
भारताची खराब सुरुवात -
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सपाट खेळपट्टीवर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल, असा अंदाज होता. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक सुरुवात केली. इंग्लंडच्या आक्रमणासमोर भारताचे तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे भारताचा डाव अडचणीत सापडला होता. सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल आणि रजत पाटीदार यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. पहिल्याच सत्रात 33 धावांच्या मोबदल्यात भारताने तीन फलंदाज गमावले होते. पण त्यानंतर बढती मिळालेल्या रवींद्र जाडेजाला साथीला घेत रोहित शर्माने खिंड लढवली.
रोहित - जाडेजानं डाव सावरला, द्विशतकी भागिदारी
3 बाद 33 अशी भारताची खराब स्थिती झाली होती. या परिस्थितीत रोहित शर्माने रवींद्र जाडेजाच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या सत्रात विकेट न फेकता दोघांनी संयमी फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दुसऱ्या सत्रात या जोडीने 92 धावा वसूल केल्या. रवींद्र जाडेजाने कर्णधार रोहित शर्माला संयमी साथ दिली. लोकल बॉय जाडेजा यानं परिस्थिती पाहून फलंदाजी केली. रवींद्र जाडेजा आणि रोहित शर्मा यांनी 329 चेंडूमध्ये 204 धावांची भागिदारी केली. इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील ही सर्वात मोठी भागिदारी आहे. याआधी झालेल्या दोन्ही कसोटीमध्ये भारतीयांना शतकी भागिदारीही रचता आली नव्हती. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी द्वशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.
रोहित शर्माचं शतक
त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही धडाकेबाज खेळी केली. टीम इंडियाची अवस्था 3 बाद 33 अशी बिकट झाली असताना, रोहित शर्माने शतक ठोकून, डावाला आकार दिला. रोहित शर्माने 157 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतकाला गवसणी घातली. रोहित शर्माचं हे कसोटीतील 11 वे शतक ठरलं. शतक झाल्यानंतर रोहित शर्माने गिअर बदलून, धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्क वूडने त्याला स्टोक्सकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माने 196 चेंडूत 131 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले.