Ind vs Nz 1st T20 : ईशान किशनची 785 दिवसानंतर एन्ट्री, पण नियतीचा पुन्हा धक्का! 3 ओव्हरमध्ये भारताचे 2 मोहरे गारद, विश्वचषकापूर्वी चिंतेचे वातावरण
Sanju Samson and Ishan Kishan Fail : 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका आजपासून सुरू झाली आहे.

India vs New Zealand 1st T20 : 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका आजपासून सुरू झाली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली असून अवघ्या 3 षटकांत संघाने दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत.
संजू सॅमसनची चांगली सुरुवात, पण घात झाला
डावाची सुरुवात करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. दुसऱ्या षटकात काईल जेमीसनविरुद्ध संजू सॅमसनने दोन चौकार मारत आपल्या लयीचे संकेत दिले होते. मात्र, याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात मारला. संजू 7 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. 18 धावांवर भारताला पहिला धक्का बसला.
ईशान किशनही अपयशी
पहिला धक्का बसल्यानंतर 785 दिवसांनी टीम इंडियात आलेला ईशान किशन क्रीझवर आला, पण तोदेखील फार काळ तग धरू शकला नाही. तिसऱ्या षटकात जॅकब डफीने इशानला आपल्या जाळ्यात ओढले. पाचव्या चेंडूवर मोठा शॉट खेळताना इशान झेलबाद झाला. त्याने 5 चेंडूत केवळ 8 धावा केल्या. 27 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली असून दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने भारतीय संघ दबावाखाली आला आहे.
विश्वचषकापूर्वी चिंतेचे वातावरण
पुढील महिन्यात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे स्वस्तात बाद होणे ही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. सध्या मैदानात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दाखल झाला असून, त्याच्या खांद्यावर आता डावाला सावरण्याची मोठी जबाबदारी आहे.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेदेखील आपली रणनीती स्पष्ट केली. "आम्हालाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीच करायची होती. मात्र, आता फलंदाजी करताना चांगले आव्हान उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल." यासोबतच त्याने प्लेइंग इलेव्हनमधील बदलांची माहिती दिली. या सामन्यात श्रेयस अय्यर, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये (प्लेइंग इलेव्हन) नसतील, असे त्याने स्पष्ट केले.
न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन - टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
हे ही वाचा -





















