Rohit Sharma : मोठी धावसंख्या नाही, तरीही विराटला पाठीशी घालणार का? रोहित म्हणाला, नक्कीच, फायनलसाठीच त्याने धावांची सेव्हिंग केलीय!
Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मोठ्या धावसंख्येसाठी संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीची पाठराखण केली आहे. फायलनमध्ये देखील विराटला संधी देणार असल्याचं रोहित म्हणाला.
गयाना : भारतानं(Team India ) दमदार कामगिरी करत इंग्लंडला (England) सेमी फायनलमध्ये पराभवाचं पाणी पाजलं. भारतानं या विजयासह टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियानं इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 57, सूर्यकुमार यादव 47 आणि हार्दिक पांड्याच्या 23 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. मात्र, किंग कोहलीची बॅट या मॅचमध्ये देखील तळपली नाही. विराट कोहली (Virat Kohli) 9 धावा करुन बाद झाला. विराट कोहलीला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर गवसलेला नाही. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरूद्धच्या मॅचमधील फलंदाजी वगळता विराटला इतर मॅचमध्ये त्याच्या लौकिकाप्रमाणं फलंदाजी करता आलेली नाही. रोहित शर्माला पोस्ट मॅच प्रेझेंटशनच्या कार्यक्रमात विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला गेला. रोहितनं किंग कोहलीला फुल सपोर्ट असल्याचं म्हटलं.
रोहित शर्मा म्हणाला की, "विराट कोहली एक क्लास खेळाडू आहे, कोणताही खेळाडू या प्रकारच्या टप्प्यातून जात असतो. आम्ही त्याचा क्लास आणि महत्त्व समजून घेतो. फॉर्म कोणतीही समस्या नाही. इंटेट म्हणजे हेतू तोच आहे. बिल्कूल मला पूर्ण विश्वास आहे. विराट कोहली पुढे मोठं काहीतरी करणार आहे. विराटनं त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी अंतिम फेरीसाठी राखून ठेवलीय", असं रोहित शर्मा म्हणाला.
कोच राहुल द्रविड यांचाही विराटवर विश्वास
विराट कोहली यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्माच्या साथीनं करत आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाची सुरुवात करताना दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑरेंज कॅप जिंकली आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनं विशेष रणनीतीचा भाग म्हणून विराट कोहलीला सलामीला संधी दिली आहे. रोहित शर्माप्रमाणं विराट कोहलीवर राहुल द्रविडनं विश्वास ठेवला आहे. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत विराटकडून मोठं घडणार आहे, असं राहुल द्रविड म्हणाले.
Question - do you back Virat Kohli to score big in the Final?
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 27, 2024
Rohit Sharma - absolutely, he's saving it for the Final (smiles). pic.twitter.com/nCgStII34v
भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत
दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला 9 विकेटनं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसरीकडे भारतानं इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. आता भारताकडे 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील पराभव, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभव विसरुन टीम इंडियानं अंतिम फेरीत धडक दिलीय. रोहित शर्मा भारताला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.