Rohit Sharma ODI Record : रोहित शर्मानं संपवला शतकांचा दुष्काळ! इंदूरमध्ये ठोकलं 30 वं एकदिवसीय शतक, खास रेकॉर्डही नावावर
Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंदूर येथील एकदिवसीय सामन्यात 30वं शतक झळकावलं आहे. रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावा केल्या.
IND vs NZ, ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zeland) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये पार पडत आहे. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. इंदूर वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी केली. यावेळी भारतीय कर्णधार रोहितनं बऱ्याच काळापासूनचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.
हिटमॅनने संपवला 3 वर्षांचा दुष्काळ
रोहित शर्माने जवळपास तीन वर्षांनी वनडे फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे. याआधी, त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे शतक झळकावले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला होता. त्यानंतर हिटमॅन वनडे फॉरमॅटमध्ये शतकाचा टप्पा ओलांडू शकला नाही. मात्र, यानंतर त्याने 5 वेळा अर्धशतकांचा टप्पा पार केला होता. अखेर आज रोहित शर्माने इंदूरमध्ये शतक ठोकत 3 वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.
रोहित शर्माने पॉटिंग आणि सनथ जयसूर्याच्या रेकॉर्डशी केली बरोबरी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. भारतीय कर्णधाराने वनडे फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्या यांची बरोबरी केली आहे. या दोन्ही माजी दिग्गजांच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 30-30 शतके आहेत. रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये आणखी एक शतक झळकावताच रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्याला मागे टाकू शकणार आहे.
यासोबतच या सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड शर्माने नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सामन्यापूर्वी रोहितला जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी चार षटकारांची गरज होती. डावाची सुरुवात करण्यासाठी आल्याआल्याच हिटमॅनने जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत 270 षटकार ठोकले होते. त्याच वेळी, रोहितने आता वनडे क्रिकेटमध्ये 273 षटकार ठोकले आहेत. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहितने शतक ठोकलं असून बऱ्याच काळानंतर त्याने सेन्चूरी ठोकली आहे. रोहित 85 चेंडूत 101 धावा केल्या. यावेळी त्याने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले.
हे देखील वाचा-