(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रहमानउल्ला गुरबाजनं मोडला धोनीचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड; पाकिस्तानविरुद्ध केली धडाकेबाज कामगिरी
रहमानउल्ला गुरबाजनंही आपल्या खेळीच्या जोरावर 3 दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी 5 एकदिवसीय शतकं झळकावून गुरबाज या वयात अधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे.
Rahmanullah Gurbaz Surpasses MS Dhoni Record: पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसरा एकदिवसीय सामना रंजक झाला. या सामन्यात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, पण अखेरीस पाकिस्ताननं हा सामना एका विकेटनं खिशात घातला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाकडून शानदार फलंदाजी झाली. सर्वात आधी फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघानं 50 ओव्हर्समध्ये 300 धावा केल्या. यामध्ये 21 वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजच्या 151 धावांच्या विक्रमी खेळीनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
रहमानउल्ला गुरबाजनंही आपल्या खेळीच्या जोरावर 3 दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी 5 एकदिवसीय शतकं झळकावून गुरबाज या वयात अधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि श्रीलंकेचा उपुल थरंगा 6-6 शतकांसह अव्वल स्थानावर आहेत.
त्याच्या 151 धावांच्या खेळीसह, रहमानउल्ला गुरबाज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. यासोबतच विकेटकिपर फलंदाज म्हणून गुरबाजनं धोनीचा विक्रमही मोडीत काढला आहे. 2005 मध्ये धोनीनं पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची खेळी केली, जी पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये कोणत्याही विकेटकिपरची सर्वोच्च खेळी होती. आता गुरबाजनं हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गुरबाजनं केवळ 23 एकदिवसीय डावांत 5 शतकं झळकावली
रहमानउल्ला गुरबाजनं वनडेमध्ये 5 शतकं पूर्ण करण्यासाठी केवळ 23 डाव खेळले. या प्रकरणात पाकिस्तानी संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम यानं 25 डाव खेळले होते. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान 5 शतकं करण्याचा विक्रम क्विंटन डी कॉक आणि इमाम-उल-हक यांच्या नावावर आहे, ज्यांनी केवळ 19-19 डावांमध्ये ही कामगिरी केली.