T20 World Champion : चॅम्पियन झालेल्या ऑस्ट्रेलियाला 12 कोटींचं बक्षीस, पण IPL उपविजेत्यापेक्षा कमीच
T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप-2021 च्या खिताबावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघावर बक्षीसांचा पाऊस पडला आहे. पण ही रक्कम आयपीएलमधील बक्षीसाच्या तुलनेत कमीच आहे.
Prize Money for Winner : न्यूझीलंडचा पराभव करत टी-20 विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा वर्षाव होत आहे. विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. तर उपविजेता न्यूझीलंड संघाला 6 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. तर उपांत्य फेरीत पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी 3-3 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. टी-20 विश्वचषकातील ही रक्कम आयपीएलच्या तुलनेत कमी असल्याचं दिसतेय.
विश्वचषकाआधी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत विजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला 20 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं होतं. तर उपविजेत्या कोलकाता संघाला 12.5 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. या दोन्ही संघाला मिळालेली रक्कम टी-20 विश्वचषक विजेत्या संघापेक्षा जास्तच आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या दोन संघाना प्रत्येकी 8.75 कोटी रुपये मिळाले होते. उपविजेत्या न्यूझीलंडला मिळालेल्या बक्षीसापेक्षा जास्तच आहे. जागतिक स्थरावरील या स्पर्धेचे बक्षीस प्रतिष्ठेच्या मानाने खूपच कमी आहे. यातुलनेत आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस पडतो.
दरम्यान, आयसीसी टी20 विश्वचषकात सुपर 12 स्टेजनंतर प्रत्येक विजयावर संघांना बोनस अवार्ड देण्यात आलाय. सुपर 12 स्टेजमध्ये झालेल्या एकूण 30 सामन्यात 40 हजार डॉलर म्हणजेत एक कोटी 20 लाख डॉलरचं बक्षीस देण्यात आलेय. सुपर 12 स्टेजच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 70 हजार डॉलरचं बक्षीस देण्यात आलेय. तर पात्रता फेरीतून बाहेर जाणाऱ्या संघाना प्रत्येकी 40 हजार डॉलर रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेटनं पराभव करत ऑस्ट्रेलियानं चषकावर नाव कोरलं आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियानं क्रिकेट जगतावरील आपला दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडे सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या 8 ट्रॉफी आहेत. ऑस्ट्रेलिया 1987, 1999, 2003, 2007, 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे चॅम्पियन झाले होते. 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता टी-20 मध्येही चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या सर्वाधिक 8 ट्रॉफी आहेत. त्यानंतर भारत आणि वेस्ट विडिंजकडे प्रत्येकी पाच-पाच ट्रॉफी आहेत.
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन -
ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन झालाय. 2007 पासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात झाली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यावेळी ऑस्ट्रेलियानं कोणतीही चूक केली नाही.
टी – 20 विश्वचषकावर नाव कोरणारे संघ -
2007: भारत
2009: पाकिस्तान
2010: इंग्लंड
2012: वेस्ट विंडिज
2014: श्रीलंका
2016: वेस्ट विंडिज
2021 : ऑस्ट्रेलिया