पाकिस्तान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करेल! : पाकिस्तानचा माजी कर्णधार
विश्वचषकातील महेंद्रसिंह धोनीच्या स्ट्राईक रेट विषयी प्रश्नचिन्हही त्यांनी उपस्थित केलं. मात्र वेस्ट इंडियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीची रणनिती परिस्थितीनुसार योग्य होती. भारतीय संघात धोनीची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलं.
लंडन : क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाचा सामना रविवारी यजमान इंग्लंड विरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट फॅन्स पेक्षा पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सचं या सामन्यावर जास्त लक्ष असणार आहे. कारण या सामन्यामुळे पाकिस्तानचं विश्वचषकातील पुढील वाटचाल अवलंबून आहे. पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार मुश्ताक मोहम्मद यांनीही या सामन्यात भारतीय संघ जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान भारताला सपोर्ट करेल. भारताने इंग्लंडला पराभूत केलं तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी निर्माण होईल. त्यामुळे विराटच्या टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करावा असं प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेट फॅनला वाटत आहे, असं मुश्ताक मोहम्मद यांनी म्हटलं.
यावेळी मुश्ताक मोहम्मद यांनी जसप्रीत बुमराहाच्या गोलंदाजीचं तोंडभरून कौतुक केल. बुमराहला पाहिल्यानंतर वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज कॉलिन क्रॉफ्ट आणि इंग्लंडच्या बॉब विलिसची आठवण येते. बुमराहसारखे गोलंदाज क्वचित असतात, अशा शब्दात मुश्ताक मोहम्मद यांनी बुमराचं कौतुक केलं.
विश्वचषकातील महेंद्रसिंह धोनीच्या स्ट्राईक रेट विषयी प्रश्नचिन्हही त्यांनी उपस्थित केलं. मात्र वेस्ट इंडियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीची रणनिती परिस्थितीनुसार योग्य होती. भारतीय संघात धोनीची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलं.
एकीकडे मुश्ताक मोहम्मद भारतीय संघाचं समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बासित अलीनं टीम इंडियाच्या विरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीचं दार उघडू नये, म्हणून टीम इंडिया बांगलादेश आणि श्रीलंका संघांकडून जाणूनबुजून हार स्वीकारेल, असा दावा बासित अलीनं केला आहे. पाकिस्तानातल्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना बासित अलीनं अकलेचे तारे तोडले आहेत.
Question to all Pakistan fans .. England vs INDIA .. Sunday .. who you supporting ? ????— Nasser Hussain (@nassercricket) June 26, 2019
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने देखील पाकिस्तानी फॅन्सना ट्विटरवर प्रश्न विचारला आहे. "रविवारच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाकिस्तान कोणाला सपोर्ट करणार?" असा प्रश्न नासिरने का विचारला हे माहित नाही, मात्र जवळपास सर्व पाकिस्तानी फॅन्सनी भारताला सपोर्ट केलं.