Pakistan Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, परंतु त्याबद्दल वाद सुरूच आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध चांगले नसल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबाबतचा निर्णय भारत सरकारवर सोडला आहे. बीसीसीआयने ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्य कुठल्यातरी देशात आयोजित करण्याची मागणी केली आहे. 


मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ही स्पर्धा पाकिस्तानातच होणार यावर ठाम असून त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत असे दिसत आहे.


स्टेडियममध्ये भाड्याने बसवल्या लाइट


लाहोर आणि कराचीच्या स्टेडियममध्ये नवीन फ्लड लाइट बसवण्याची पीसीबीची योजना आहे. पण या लाइट भाड्याने बसविण्यात येणार आहेत जेणेकरून स्पर्धेदरम्यान चांगली प्रकाश व्यवस्था होऊ शकेल. याशिवाय, पीसीबीने क्वेटा, अबोटाबाद आणि पेशावरच्या स्टेडियममध्ये भाड्याने फ्लड लाइट बसवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून देशांतर्गत हंगामातील सामने उन्हाळ्यात खेळता येतील. पीसीबीने या नवीन लाइट लावण्यासाठी सुरुवात केली आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तान भाड्याने उपकरणे वापरत आहे. यावरून स्पष्ट होते की त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण तरीही त्यांना आयसीसी स्पर्धा करायच्या आहेत.


संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार का?


मात्र, यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खरंच पाकिस्तानात होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. या वादाची परिस्थिती बहुतांशी मागील आशिया कप सारखीच आहे, जिथे बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यावेळीही बीसीसीआय आपल्या मागणीवर ठाम राहिली आणि शेवटी ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आयोजित केली. यावेळीही बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याची मागणी करत आहे.


या संपूर्ण परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार होण्याची आशा फारशी दिसत नाही. बीसीसीआय आपल्या मागणीवर ठाम असताना पीसीबीही स्टेडियम तयार करण्यात व्यस्त आहे. दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर भविष्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आणि त्याचे ठिकाण कसे ठरवले जाते हे पाहणे मनोरंजक असेल.


ही पण वाचा :


MS Dhoni IPL 2025 : 'माही मार रहा है....'', पुन्हा ऐकू येणार हा आवाज! MS धोनीसाठी BCCI आयपीएलमध्ये आणणार नवीन नियम?


Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा