Jay Shah on Ishan Kishan : भारतीय संघाचा स्टार फलंदाज इशान किशनचा बुची बाबू स्पर्धेत धमाका पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसांनी लाल चेंडूचे क्रिकेट खेळणारा किशन या स्पर्धेत झारखंडचे कर्णधारपद भूषवत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इशान किशनने शानदार शतक झळकावून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा दावा ठोकला आहे. मात्र इशानला पुनरागमन करण्यासाठी काय करावे लागेल हे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जय शाहने स्पष्ट केले आहे की, जर इशान किशनला टीम इंडियामध्ये परतायचे असेल तर त्याला नियमांचे पालन करावे लागेल. नियम म्हणजे त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. हा तोच इशान किशन आहे ज्याला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे केंद्रीय करार यादीतून वगळले होते.


86 चेंडूत ठोकले शतक 


इशान किशनने यापूर्वी बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असेल, पण आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. बुची बाबू टूर्नामेंटमध्ये त्याने मध्य प्रदेश विरुद्ध 86 चेंडूत शतक झळकावले, पण त्याची खेळी आणखी एका कारणासाठीही खास होती. कारण, कठीण परिस्थितीत खेळताना त्याने 61 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतर त्याने स्फोटक फलंदाजी केली. 61 चेंडूत अर्धशतक आणि पुढच्या 50 धावा त्याने फक्त 25 चेंडूत केल्या. या काळात त्याने 39 चेंडूत केवळ 9 चेंडूत षटकार ठोकले होते. किशनने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना टी-20 नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात किशन 5 चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाला होता.






इशानच्या पुनरागमनाची चर्चा आहे तरी का?


इशान बुची बाबू या स्पर्धेत झारखंडचे नेतृत्व करत आहे. बुची बाबूनंतर 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीच्या या निर्णयामुळे इशानच्या भारतीय संघात संभाव्य पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. भारताला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इशानने दोन्ही स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केल्यास तो पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्याने भारतासाठी दोन कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


संबंधित बातमी :


Ishan Kishan : 6,6,6,6,6,6.... इशान किशनने पाडला षटकारांचा पाऊस! ठोकलं धमाकेदार शतक; बांगलादेशविरुद्ध गंभीर देणार संधी?


पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार भांडण, प्रिती झिंटा कोर्टात पोहोचली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण