टीम इंडियाकडून दिवाळी भेट, नेदरलँड्सचा केला 160 धावांनी पराभव
IND Vs NED, Match Highlights : अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केले.
IND Vs NED, Match Highlights : अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केले. या विजयासह भारताने यंदाच्या विश्वचषकात सलग नवव्या विजयाची नोंद केली. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत न्यूझीलंडविरोधात होणार आहे. भारताने बंगळुरुमध्ये प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युतरदाखल नेदरलँड्सचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला. नेदरँलँड्सकडून Teja Nidamanuru याने अर्धशतकी खेळी. भारताकडून कुलदीप यादव, सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या एकाही फलंदाजाला मैदानात फार काळ टिकता आले नाही. ठरावीक अंताराने विकेट फेकल्या. बारसी याने फक्त चार धावा केल्या. मॅक्स ओडियाड याने 30 धावांचे योगदान दिले. कोलिन एकरमन याने 35 धावा केल्या. एंजलब्रेट याने 45 धावा केल्या. स्कॉट एडर्वड्स याने 17 धावा केल्या. बास डे लीडे याने 12, लोगन वॅन बीक याने 16वॅन डर मार्वे याने 16 धावांचे योगदान दिले. आर्यन दत्त याने पाच धावांचे योगदान दिले. Teja Nidamanuru याने 39 चेंडूत सहा षटकांच्या मदतीने 54 धावांचे योगदान दिले.
भारताचा दमदार सराव -
भारताने प्रथम फलंदाजी करताना खोऱ्याने धावा काढल्या. त्यानंतर गोलंदाजीचाही सराव केला. भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनीही गोलंदाजीत हात अजमावला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. विराट कोहलीने तीन षटकात 13 धावा दिल्या. रोहित शर्माने अखेरची विकेट घेतली. सूर्या आणि शुभमन गिल यांनीही दोन दोन षटके गोलंदाजी केली.
भारताचा 410 धावांचा डोंगर -
भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं झंझावाती शतकं साजरी केली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.