(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AFG : बुमराह-हार्दिकचा भेदक मारा, अफगाणिस्तानची 272 धावांपर्यंत मजल, शाहीदीची एकाकी झुंज
World Cup 2023: जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 50 षटकात 272 धावांवर रोखले.
IND Vs AFG, Innings Highlights : जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 50 षटकात 272 धावांवर रोखले. अफगाणिस्तानकडून कर्णधार शाहीदी याने झुंजार 80 धावांची खेळी केली. तर उमरजई याने 62 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. सपाट खेळपट्टीवर भारताला विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.
या सामन्यात निर्णायक विजयाच्या दोन गुणांच्या वसुलीसह आपला नेट रनरेट वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकण्याचं आव्हान खूपच कठीण आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या कामगिरीवर क्रिकेटरसिकांची नजर राहिल.
कर्णधाराची शानदार खेळी -
अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने शानदार 80 धावांची खेळी केली. कुलदीप यादव याने त्याला तंबूत पाठवले. तीन विकेट झटपट पडल्यानंतर शाहीदीने संयमी फलदाजी करत डाव संभाळला. शाहीदीने 88 चेंडूत 80 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला. शाहीदीने उमरजई याच्यासोबत शतकी भागिदारी करत डावाला आकार दिला.
उमरजईची झंझावती खेळी -
63 धावांत तीन विकेट पडल्यानतर उमरजई याने कर्णधाराला चांगली साथ दिली. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. उमरजई याने 69 चेंडूत 4 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 62 धावांची झंझावती खेळी केली. उमरजई आणि शाहिदी यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 128 चेंडूत 121 धावांची महत्वपूर्ण भागिदारी झाली. या भागिदारीमुळेच अफगाणिस्तान संघाने 200 धावांचा टप्पा पार केला.
अफगाण फलंदाजाचा फ्लॉप शो -
अफगाणिस्तानचा कर्णधार शाहीदी आणि उमरजई यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेलळी करता आली नाही. एकही फलंदाज तीस धावसंख्याही पार करु शकला नाही. सलामी फलंदाज गुरबाज याने 28 चेंडूत 1 षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. इब्राहीम जादरान याने 28 चेंडूत चार चौकाराच्या मदतीने 22 धावांचे योगदान दिले. रहमत शाह याने 22 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. शाहीदी आणि उमरजई यांनी कठीण परिस्थितीमध्ये अर्धशतकी खेळी केली. पण या दोघांची विकेट पडल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला. अनुभवी मोहम्मद नबी याला 27 चेंडूमध्ये फक्त 19 धावांची खेळी करता आल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. एन जादरन याला 8 चेंडूत दोन धावा करत्या आल्या.
कुलदीप यादवचा शानदाल स्पेल
चायनामन कुलदीप यादव याने आपल्या 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. कुलदीप यादवने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. कुलदीप यादवने आपल्या दहा षटकांमध्ये फक्त 40 धावा खर्च करत एक विकेट घेतली. रविंद्र जाडेजाने आपल्या 8 षटकांच्या स्पेल 38 धावा खर्च केल्या. जाडेजाला विकेट घेण्यात यश आले नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी सपाट खेळपट्टीवर फलंदाजांना बांधून ठेवले.
बूम बूम बुमराहचा भेदक मारा -
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमारह याने पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकात भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहने आपल्या 10 षटकांमध्ये फक्त 39 धावा खर्च केल्या. बुमराहने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. शार्दूल ठाकूर याने 6 षटकांमध्ये 31 धावा खर्च करत एक विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 7 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज महागडा ठरला. सिराजला 9 षटकांमध्ये 70 पेक्षा जास्त धावा कुटल्या.