NZ vs BAN: न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय. बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन आऊट करून बोल्टनं कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्सचा टप्पा गाठलाय. न्यूझीलंडकडून 300 विकेट्स घेणारा बोल्ट चौथा खेळाडू ठरलाय. 


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट्स घेण्याच्या बाबतीत बोल्टनं टीम साऊथी, जेम्स अँडरसन आणि नॅथन लियॉनसारख्या गोलंदाजांना मागे टाकलंय. बोल्टनं आपल्या 75व्या कसोटी सामन्यात 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. याशिवाय, साऊथीनं 76 कसोटी सामन्यात आणि लियॉननं 77 व्या कसोटी सामन्यात 300 विकेट्सचा टप्पा गाठला होता. तर, अँडरसननं त्याच्या 81 व्या सामन्यात 300 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. न्यूझीलंडसाठी रिचर्ड हॅडलीनं सर्वात जलद 300 विकेट्स घेतले आहेत. त्यानं 61 व्या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 300 विकेट्स मिळवले होते. 


कू-







कसोटीमध्ये सर्वात जलद 300 विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा फिरकीपटू आर आश्विनच्या नावावर आहे. त्यानं 54 व्या कसोटी सामन्यातच 300 विकेट्स घेऊन इतिहास रचला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डेनिस लिली (56 सामन्यात 300 विकेट्स) दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरन (58 सामन्यात 300 विकेट्स) तिसऱ्या स्थानी आहेत. 


बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ट्रेंट बोल्टने पाच विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडने 6 बाद 521 धावांवर डाव घोषित केला, तर बांगलादेशचा डाव 126 धावांवर आटोपला. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवलाय. तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका ड्रॉ करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेशनं याआधी न्यूझीलंडमध्ये त्यांच्याविरोधात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha