Virat Kohli PC Today: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही आठवड्यापासून मीडियापासून दूर राहिल्यानंतर विराट कोहली अखेर आज दुपारी 3.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आलीय. वादाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलय.
विराटनं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईत शेवटची पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यानं एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्याबद्दल मत व्यक्त केलं होतं. तसेच भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचाही दावा फेटाळून लावला होता. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. महत्वाचे म्हणजे, या दौऱ्यात विराट एकदाही पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला नाही. यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. याचदरम्यान, भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट त्याच्या 100 व्या कसोटी सामन्याच्या पूर्व संध्येला पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.
विराटला दुखापतीमुळं जोहान्सबर्ग कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं होतं. केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात विराट पुनारागमन करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. यातच विराटनं आज दुपारी 3.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहे. या पत्रकार परिषदेत विराट नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. तसेच विराट पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्यामागचं नेमकं कारण काय? या प्रश्नाचही उत्तर समोर येण्याची शक्यता आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha