Afghanistan vs New Zealand: भारताच्या धर्तीवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा पहिला दिवस ओल्या मैदानामुळे रद्द करावा लागला. सामनाधिकाऱ्यांनी दिवसभरात अनेकदा मैदानाचे निरीक्षण केल्यानंतर अखेर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी या ग्रेटर नोएडामध्ये पाऊस झाला नाही पण आधुनिक ड्रेनेज सिस्टीमचा अभाव असल्याने मैदान खेळण्यायोग्य करण्यात आयोजकांना अपयश आले. आता यावर अफगाणिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. 


अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, पुन्हा याठिकाणी कधीच खेळण्यासाठी येणार नाही. तसेच आमची पहिली पसंत लखनौ होतं, ग्रेटर नोएडा नाही. इकडे खूप गडबड आहे. ग्रेटर नोएडात खराब व्यवस्थापन असून ट्रेनिंगमध्ये विविध गोष्टींचा कमीपणा देखील जाणवत होता, असं या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या सामन्यात कितपत खेळ होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 2017 मध्ये कसोटीचा दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तान संघाने एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत.




बीसीसीआयची अफगाणिस्तानचे सामने भारतात आयोजित करण्यास-


बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाली, तेव्हा बीसीसीआय हे अफगाण संघाला पाठिंबा देणारे पहिले क्रिकेट बोर्ड होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच अफगाणिस्तान संघासाठी ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौ या तीन घरच्या मैदानांची घोषणा करू शकते. तालिबान राजवट सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी अखेर बीसीसीआयने अफगाणिस्तानचे सामने भारतात आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.


टीम इंडियाचा 'गुरु' आता अफगाणिस्तान संघाला प्रशिक्षण देणार-


अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांचा समावेश केला आहे. रामकृष्णन श्रीधर अफगाणिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाले आहेत. मात्र अफगाणिस्तानने आर श्रीधर यांचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नव्हे तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून रामकृष्णन श्रीधर यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्याबाबत माहिती दिली आहे.


देशात एकही क्रिकेटचे मैदान नाही-


राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वतःचे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली. क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत. काबूलमध्ये एकच जागतिक दर्जाचे मैदान आहे. मात्र आतापर्यंत येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. भारत हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे दुसरे घर आहे. सध्या अफगाणिस्तानचा संघ दुबईतील शारजात सराव करतो.


भारताचा पाठिंबा निर्णायक ठरला-


अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांत क्रिकेटची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आता क्रिकेट हा तिथे सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. अफगाणिस्तान जिंकला की देशात उत्सवासारखे वातावरण असते. क्रिकेट न समजणारे लोकही अफगाणिस्तानचा झेंडा फडकताना बघण्यासाठी क्रिकेटची मॅच बघत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या प्रवासात भारत आणि बीसीसीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात भारताचा पाठिंबा निर्णायक ठरला होता. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने झपाट्याने प्रगती केली आहे. 2010मध्ये पहिल्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी हा संघ पात्र ठरला होता.


संबंधित बातमी:


 T20 World Cup 2024 Afghanistan: देशात एकही मैदान नाही, सत्तापलट, भारताचा पाठिंबा, 8 महिन्यात उलटफेर; अफगाणिस्तानच्या जिद्दीचा विजय!