Mohammed Shami Return Update : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पासून भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून शमी पुनरागमन करू शकेल, असे मानले जात होते. मात्र आता चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. वर्ल्ड कप दरम्यान दुखापत होऊनही शमीने संपूर्ण स्पर्धा खेळली आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. या कारणामुळे तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. आता त्याच्या पुनरागमनाबाबत नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, तो बांगलादेश मालिकेत नाही, तर न्यूझीलंड कसोटी मालिकेत आणि त्याआधी बंगालच्या रणजी ट्रॉफीमध्ये ॲक्शन करताना दिसणार आहे.
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे अपडेट
गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान जबरदस्त कामगिरी केली होती आणि अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले होते. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स त्याने घेतल्या होत्या. पण, आता त्याच्या दुखापतीमुळे तो अनेक महिने झाले संघातून बाहेर आहे. त्याच वेळी, आता त्याच्या पुनरागमनाची उलटी गिनती सुरू झाली आहे, परंतु बांगलादेश मालिका यासाठी निश्चित नाही. असा दावा केला जात आहे की टीम इंडियात पुनरागमन करण्यापूर्वी शमी बंगालसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पहिले एक किंवा दोन सामने खेळताना दिसणार आहे. बंगालचा पहिला सामना 11 ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेशशी आणि दुसरा सामना 18 ऑक्टोबरपासून बिहारविरुद्ध होणार आहे.
न्यूझीलंड मालिकेत शमी खेळणार?
रणजी ट्रॉफीत खेळल्यानंतर मोहम्मद शमी टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्यात तो खेळताना दिसू शकतो. भारताला 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा होणार आहे. या कारणास्तव, निवडकर्त्यांना शमीवर दुलीप ट्रॉफी किंवा बांगलादेश मालिकेत पुनरागमन करण्यासाठी दबाव आणण्याची आणि घाई करण्याची इच्छा नाही. मोहम्मद शमीने भारतासाठी आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळले असून 229 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने 6 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.