कोरोनातून बरा झालेला सचिन तेंडुलकर प्लाझ्मा दान करणार; लोकांनाही केलं आवाहन
शनिवारी आपला 48 वा वाढदिवस साजरा करणारा सचिन 27 मार्च रोजी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. खबरदारी म्हणून त्याला काही काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
मुंबई : सचिन तेंडुलकर नुकताच कोरोनातून बरा होऊन घरी परतला आहे. आज त्याचा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने प्लाझ्मा दान करण्याची घोषणा केली आहे. मी जेव्हा पात्र असेल तेव्हा मी प्लाझ्मा दान करणार असल्याचे सचिनने सांगितले. सचिन 27 मार्चला कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारी म्हणून काही काळ त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
सचिनने आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, की 'मला एक संदेश द्यायचा आहे. जो डॉक्टरांनी मला देण्यास सांगितला आहे. मी प्लाझ्मा दान केंद्राचे उद्घाटन केले आणि त्यांचा संदेश होता, जर योग्य वेळी प्लाझ्मा दिला गेला तर रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. ते म्हणाले, की 'जेव्हा मी पात्र होईल तेव्हा मी प्लाझ्मा दान करेल आणि मी माझ्या डॉक्टरांशी बोललो.'
तेंडुलकरला 8 एप्रिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. नंतर तो घरी आयसोलेट होता. प्लाझ्मा देण्यापूर्वी व्यक्तीला 14 दिवसांपर्यंत कोणतीही लक्षणे नसावी. या अनुभवी फलंदाजाने कोविड 19 मधून बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करून इतरांना मदत करण्यास सांगितले आहे.
सचिन म्हणाला, की कोविड 19 मधून बरे झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही पात्र झाल्यावर कृपया रक्तदानही करा. बर्याच समस्यांचे निदान याद्वारे केले जाऊ शकते. 'आपण आजारी असताना आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना कितीतरी समस्यांचा सामना करावा लागतो. उपचारादरम्यान सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मदत केलेल्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
'वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांमुळे माझा आजचा दिवस खास बनला. मागील एक महिना माझ्यासाठी खूप कठीण होता. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी 21 दिवस वेगळा होतो. 'तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या शुभेच्छा, सर्व डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी मला सकारात्मक ठेवले. ज्याने मला या रोगातून मुक्त होण्यास मदत केली, असे म्हणत सर्व हितचिंतकांचे सचिनने आभार मानले आहे.