Rohit Sharma : रोहित शर्मा टी20 विश्वचषकात खेळणार की नाही? हिटमॅन म्हणाला...
2024 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना रोहितनं मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 2024 च्या टी20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) मोठे वक्तव्य केले आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज (26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने ही पत्रकार परिषद घेतली आहे.
टी20 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार?
2024 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला होता. यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "मला माहिती आहे की, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला याबाबत लवकरच समजेल. क्रिकेट खेळण्यासाठी मी आतूर आहे. संघातील प्रत्येकाला चांगली कामगिरी करायची आहे."
रोहित शर्माने शेवटचा सामना खेळून वर्ष उलटलं...
टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कोण करणार? हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, रोहित शर्माला टी20 सामना खेळून वर्ष उलटलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा टी20 सामना खेळला होता. रोहितने हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. इंग्लडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्यानेच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. 2023 च्या वनडे विश्वचषकात हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर सुर्यकुमार यादवकडे भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
वनडे विश्चचषकानंतर रोहित-विराटला विश्रांती
वनडे विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मालिकेसाठी टीम इंडियाने रोहित आणि विराटला विश्रांती दिली होती. आता भारतीय संघ जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरोधात पुढील टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित आणि विराट खेळताना दिसणार की दोघांना विश्रांती देण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला आज सुरुवात
टी 20 आणि वनडे मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ आज (दि.26) कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 26 डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल? याची चर्चा सुरु आहे. भारताचा दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.