KL Rahul Wedding : श्रीलंकेविरुद्ध टी20-एकदिवसीय मालिकेला केएल राहुल मुकणार, लग्नासाठी मागितली सुट्टी
KL Rahul Wedding: केएल राहुल पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान तो आपल्या लग्नासाठी बीसीसीआयकडून सुट्टी घेणार असल्याचं समोर येत आहे.
KL Rahul News : भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) सध्या त्याच्या लग्ना;च्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्यात बांगलादेश दौऱ्यात तो खास कामगिरी करु शकला नाही आणि आता बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान या मालिकेला राहुल मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या मालिकेवेळी केएल राहुल त्याच्या लग्नासाठी सुट्टी घेणार असल्याने या संपूर्ण मालिकेत राहुल संघाबाहेर असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. दरम्यान या दरम्यान केएल राहुल अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) हिच्यासोबत लग्नबंधणात अडकणार आहे. त्यामुळे राहुल त्याच्या लग्नासाठी बीसीसीआयकडून सुट्टी घेणार आहे. राहुलच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी श्रीलंका मालिकेदरम्यानच तो लग्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लग्नानंतर तो पुन्हा एकदा 18 जानेवारी 2023 पासून खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड मालिकेत संघात सामील होईल अशी माहितीही समोर येत आहे.
राहुल टी20 मध्येही खराब फॉर्मात
केएलसाठी 2022 हे वर्ष खास नव्हतं. त्यामुळे त्याला टी20 संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. या वर्षी त्याने एकूण 4 कसोटी सामन्यात केवळ 17.12 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.88 च्या सरासरीने 251 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतकं झळकली आहेत. याशिवाय या वर्षी टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्याने 16 सामन्यांत 28.93 च्या सरासरीने 434 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 अर्धशतकं झळकावली आहेत. यावर्षी त्याने 30 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.68 च्या सरासरीने एकूण 822 धावा केल्या आहेत.
'या' खेळाडूंना संधी मिळू शकते
राहुलच्या जागी इतर खेळाडूंना T20 आंतरराष्ट्रीय संघात संधी दिली जाऊ शकते. त्यात ईशान किशन, संजू सॅमसन आणि दीपक हुडा यापैकी कोणाचा तरी समावेश केला जाऊ शकतो. यमध्ये ईशान किशनला संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता दिसत आहे. याचं कारण नुकतंच त्यानं बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज असं द्विशतक झळकावलं होतं.
हे देखील वाचा-