Video : जो रूट अन् प्रसिद्ध कृष्णा भिडले... केएल राहुल अचानक संतापला, मग मोहम्मद सिराजने घेतला बदला, नेमकं काय घडलं?
England vs India 5th Test Update : ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा शांत स्वभावाचा फलंदाज जो रूट संतापून गेला आणि भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाशी भिडला.

Joe Root vs Prasidh Krishna : क्रिकेटच्या मैदानावर असं दृश्य फारच कमी वेळा पाहायला मिळतं. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा शांत स्वभावाचा फलंदाज जो रूट संतापून गेला आणि भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाशी भिडला. क्रिकेटच्या मैदानावर दोन 'कूल' खेळाडूंमध्ये असा संघर्ष पाहून प्रेक्षकही क्षणभर गोंधळले. विशेष म्हणजे, शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा के. एल. राहुल सुद्धा यावेळी स्वतःचा संयम गमावून बसला. अखेर मोहम्मद सिराजने जो रूटला बाद करत हा तणाव मिटवला.
आक्रमक फलंदाजीला आक्रमक गोलंदाजीने उत्तर
ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात आक्रमक सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी जोरदार फटकेबाजी करत टेस्ट क्रिकेटला काही वेळासाठी टी-20चा रंग दिला. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीवर पकड घेतली आणि इंग्लंडलाच त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. याच दरम्यान आकाश दीप आणि डकेट यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूटमध्येही टोकाचा वाद झाला, ज्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही.
प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूटमध्ये शाब्दिक वाद
इंग्लंडच्या डावाच्या 24व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने सातत्याने जो रूटला शब्दांतून डिवचण्याचा प्रयत्न केला. तो वारंवार रूटच्या जवळ जाऊन काहीतरी बोलत होता, जणू त्यांचं लक्ष विचलित करायचा प्रयत्न. अखेर रूटही अस्वस्थ झाला आणि त्याने प्रसिद्धला उत्तरं द्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये सातत्याने शाब्दिक झडप सुरू होती.
You know the matter is serious when Cool personalities like Joe Root and KL Rahul gets Angry pic.twitter.com/P8a71SSZ7Z
— ' (@KLfied__) August 1, 2025
के. एल. राहुलही चिडला अन्...
अंपायर कुमार धर्मसेना हे संपूर्ण प्रसंग लक्षपूर्वक पाहत होते. वाद वाढण्याची शक्यता दिसताच त्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही खेळाडूंना वेगळं केलं. थोड्याच वेळात मोहम्मद सिराजही यात सामील झाला आणि त्यांनीही रूटसोबत काही चर्चा केली. ओव्हरच्या शेवटी रूट अंपायरकडे काही सांगताना दिसला, कदाचित त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असावी. हे पाहून के. एल. राहुलही चिडला आणि त्यांनी अंपायरकडे नाराजी दर्शवली. अंपायरने त्यालाही शांत राहण्याचा सल्ला दिला.
मोहम्मद सिराजने घेतला सूड
या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर जो रूटचं लक्ष विचलित झालं आणि याचाच फायदा मोहम्मद सिराजने घेतला. त्यांनी रूटला एलबीडब्ल्यू केलं. रूटने निर्णयाविरोधात थर्ड अंपायरकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण निर्णय भारताच्या बाजूनेच राहिला. रूटने 45 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या आणि तो माघारी परतला. मागील दोन टेस्ट सामन्यांमध्ये शतक झळकावणाऱ्या रूटचा विकेट भारतासाठी मोठा दिलासा ठरला.





















