Team India Captain: विराट-रोहितला आराम, गौतम गंभीर कुणाला कर्णधार करणार? हार्दिक-राहुलची नावं चर्चेत
KL Rahul Captain Team India : टीम इंडिया जुलै महिन्याअखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात येणार आहे.
KL Rahul Captain Team India : टीम इंडिया जुलै महिनाअखेर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट, या दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि टी20 मालिका होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना बीसीसीआयकडून आराम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचा भार कुणाच्या खांद्यावर असणार? याबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या दोन नावाची कर्णधारपदासाठी चर्चा सुरु आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात टीम इंडियाची पहिली मालिका असणार आहे. यामध्ये नेतृत्व कुणाकडे असेल.. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे कर्णधार ?
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात केएल राहुल याला संधी मिळाली नव्हती. पण आता श्रीलंका दौऱ्यात केएल राहुल याच्याकडे संघाची धुरा असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टी20 क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला टी20 संघाचं नेतृत्व मिळू शकते, असाही अंदाज वर्तवला जातोय. मिडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल वनडेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे बीसीसीआयकडून वनडेच्या कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर सोपवली जाईल. केएल राहुलने 75 वनडे सामन्यात 50.35 च्या सरासरीने 2820 धावा केल्या आहेत. त्यामध्ये सात शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीलंका दौऱ्यात वनडे संघाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याचे समोर येतेय. थोड्याच दिवसात याबाबत अधिकृत माहिती समोर येईल, असे काही रिपोर्टसमध्ये सांगण्यात येत आहे.
KL Rahul all set to captain team India for the ODI series against Sri Lanka. (India Today). pic.twitter.com/31nL6uiKGR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2024
2023 वनडे विश्वचषकात केएल राहुलची शानदार कामगिरी -
गौतम गंभीरने टीम इंडियाचा हेड कोच म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाला सुरुवात होणार आहे. 2023 च्या वनडे विश्वचषकात केएल राहुलने 450 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याने 10 डावात 75.33 च्या उत्कृष्ट सरासरीने 452 धावा केल्या. त्या स्पर्धेत त्याने एक शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली होती. केएल राहुल आणि गौतम गंभीर यांनी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केले आहे. राहुल एलएसजीचा कर्णधार आहे, तर गंभीर 2022 आणि 2023 मध्ये लखनौचा मेंटॉर होता. अशा परिस्थितीत राहुलकडे एकदिवसीय प्रकारात टीम इंडियाचा दीर्घकाळ कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे.