Aus vs SCO : विराट अन् सूर्याला मागं टाकलं, ऑस्ट्रेलियन खेळाडू वेगवान शतक झळकावत पुढे जाऊनही हिटमॅनचा विक्रम मोडण्यात अपयशी
AUS vs SCO : ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेत जोस इंग्लिस यानं दमदार शतक झळकावलं आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना काल पार पडला. या मॅचमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 196 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सलग दुसऱ्या मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी केली. विकेटकीपर असलेल्या जोश इंग्लिसनं वादळी खेळी करत वेगवान शतक झळकावलं. जोश इंग्लिसनं वेगवान शतक झळकावत इतिहास रचला. त्यानं केवळ 43 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
विराट अन् सूर्याला मागं टाकलं
जोश इंग्लिसनं स्कॉटलँड विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली, त्यानं 43 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. इंग्लिसनं विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पिछाडीवर टाकलं आहे. जोश इंग्लिसनं 43 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. या खेळीत त्यानं 49 बॉलमध्ये 103 धावा केल्या. यामध्ये त्यानं 7 षटकार आणि 7 चौकार मारले.
विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये एक शतक केलं आहे. 2022 मध्ये त्यानं अफगाणिस्तान विरुद्ध ते शतक केलं होतं. विराटनं 61 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. दुसरीकडे भारताचा टी 20 स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव यानं 45 बॉलमध्ये शतक केलं आहे. 2023 मध्ये सूर्यकुमार यादवनं श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. तर, ग्लेन मॅक्सवेल याला देखील इंग्लिसनं मागं टाकलं आहे.
रोहित शर्माचा विक्रम अबाधित
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक पूर्ण करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्मानं 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. हिटमॅननं त्या डावात 43 बॉलमध्ये 118 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं 12 चौकार आणि 10 षटकार ममारले होते. डेव्हिड मिलरनं देखील 35 बॉलमध्ये शतक केलं होतं. म्हणजेच टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर हे दोघे संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली
आस्ट्रेलियानं दुसऱ्या मॅचमध्ये स्कॉटलँडचा 70 धावांनी पराभव केला. स्कॉटलँडचा संघ 126 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानं तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. या विजयासह ऑस्ट्रेलियानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडचा पराभव केला होता.
इतर बातम्या :
IPL मध्ये दंड ठोठावला, तरीही ऐकायला तयार नाही; हर्षित राणाने दुलीप ट्रॉफीमध्ये आता काय केलं?, Video
रवींद्र जडेजाची थेट राजकारणात एन्ट्री; आमदार पत्नीने शेअर केला फोटो, दुसऱ्या इनिंगला सुरुवात!