Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यामान सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. मात्र याआधीच जय शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 


जय शाह (Jay Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) देखील अध्यक्ष आहेत. यावेळी जय शाह यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली महिला अंडर-19 टी-20 आशिया कपची घोषणा केली आहे. या स्पर्धेमुळे आशिया खंडातील युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.


जय शाह यांची मोठी घोषणा-


जय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीचे नेतृत्व केले. 1 डिसेंबरपासून ते आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील, मात्र यासोबतच जय शाह यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. मात्र अध्यक्षपद सोडण्यापूर्वीच जय शाह यांनी महिला क्रिकेटसाठी मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी प्रथमच अंडर-19 स्तरावर महिला टी-20 विश्वचषक आयोजित करण्यात आला होता आणि आता अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या घोषणेने क्रिकेट चाहत्यांना आनंद होणार आहे.






जय शाह काय म्हणाले?


आशियाई क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेची सुरुवात ही एक मोठी उपलब्धी आहे, ज्याद्वारे तरुण मुलींना मोठ्या मंचावर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. या उपक्रमाद्वारे आशियातील महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, या निर्णयांचे परिणाम काय होतील याचा विचार करताना आम्हाला अभिमान वाटतो, असं जय शाह म्हणाले.


आशिया कप कधी होणार?


आशियाई क्रिकेट परिषदेकडून या वर्षी डिसेंबरमध्ये ऐतिहासिक असा पहिला महिला टी-20 आशिया कप आयोजित केला जाऊ शकतो. त्यानंतर लवकरच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे, जो मलेशियामध्ये आयोजित केला जाणार आहे. संघांची संख्या आणि स्पर्धेचे यजमानपद याबाबत स्पष्टता नसली तरी या स्पर्धेच्या आगमनाने आशियाई क्रिकेटमधील स्पर्धेची पातळी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 


संबंधित बातमी:


आयसीसी टी-20 विश्वचषकाचा रंगणार थरार, भारत अन् पाकिस्तान पुन्हा भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक