Jay Shah ICC: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. येत्या 1 डिसेंबरपासून ते आयसीसीची जबाबदारी स्वीकारणार आहेत. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 


जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) अनेक आजी-माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने जय शाह यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचा खेळ जगभरात एक नवा ठसा उमटवेल, असे म्हटले आहे.






हार्दिक पांड्या काय म्हणाला?


टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने देखील जय शाह यांचे अभिनंदन केले आहे. ज्याप्रमाणे बीसीसीआयची प्रगती झाली, त्याचप्रमाणे तुमचा दृष्टीकोन आयसीसीला सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं हार्दिक पांड्या म्हणाला. 














कार्यकाळ कधी सुरू होईल?


आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर जय शाह 1 डिसेंबरला आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारतील. 20 ऑगस्ट रोजी आयसीसीने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ग्रेग  बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 2020 पासून ते या पदावर होते.


आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे- जय शाह


आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे असल्याचं जय शाह यांनी सांगितले. 


संबंधित बातमी:


जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले, पण 1 डिसेंबरला जबाबदारी स्वीकारणार; यामागचं कारण काय?, जाणून घ्या!