Ranji Trophy 2022-23 : ईशान किशनची तुफान फलंदाजी कायम, केरळविरुद्ध ठोकलं शतक
Ishan Kishan : बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकल्यावर रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळत ईशान किशनने शतक झळकावले आहे.
Ranji Trophy 2022-23 : सध्या डॉमेस्टीक क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022-23) खेळवली जात आहे. यामध्ये युवा खेळाडू उत्कृष्ट लयीत दिसत आहेत. झारखंड आणि केरळ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात रांचीचा स्टार खेळाडू ईशान किशनने शानदार शतक झळकावलं आहे. झारखंडकडून खेळताना त्याने दमदार फलंदाजी करत 132 धावा केल्या आहेत. यापूर्वी बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत ईशानने द्विशतक झळकावून सर्वांची मनं जिंकली होती. ईशानने त्याच्या फलंदाजीतील सातत्य कायम ठेवत आधी भारतीय संघासाठी, आता झारखंडसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ईशानच्या या कामगिरीचं त्याचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सनेही कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
झारखंड विरुद्ध केरळ सामन्यात ईशानची बॅट तळपली
झारखंड आणि केरळ यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरु असून यावेळी केरळचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावात केरळनं 475 रन स्कोरबोर्डवर लावले. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या झारखंड संघाचे सुरुवातीचे फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. सौरभ तिवारीने 97 धावा केल्या असून ईशानने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 195 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकार ठोकत 132 रन केले. ज्यामुळे केरळनं 340 पर्यंत धावसंख्या नेली असून त्यानंतर आता केरळचा संघ आपला दुसरा डाव खेळत आहे.
ईशानची प्रथम श्रेणी कारकिर्द
ईशान किशनने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 46 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 78 डावांमध्ये त्याने 38.42 च्या सरासरीने 2805 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने आतापर्यंत 5 शतकं आणि 16 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर त्याने 273 धावांचा उच्चांक ही गाठला आहे. याशिवाय त्याने 87 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 38.79 च्या सरासरीने 3026 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 15 अर्धशतकं त्यानं झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 210 धावांची आहे.
हे देखील वाचा-