India vs England 2021 | टीम इंडियाने पराभवाचा वचपा काढला; इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, विराट-इशानची विजयी खेळी
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
अहमदाबाद : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या.
पदार्पणाच्याच सामन्यात इशान किशनचं तुफानी अर्धशतक
भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्यानं निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे.
इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण 32 चेंडूंमध्ये 56 धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली.