IPL 2022 : आयपीएलच्या पुढील हंगामाची सुरुवात दोन एप्रिलपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयपीएलचे सामने कुठे आणि केव्हा होणार याबाबत चर्चा सुरु आहे. बीसीसीआय आयपीएलच्या संघ मालकांसोबत नियोजनाबाबत चर्चा करत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात दोन एप्रिल 2022 पासून होऊ शकते.  


आयपीएलच्या 15 व्या सत्रामध्ये दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ या दोन संघाची भर पडली आहे. यंदा आयपीएलमध्ये 74 सामने होणार असून दोन महिने ही स्पर्धा रंगणार आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने संघ मालकांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फायनल होणार असल्याचं सांगितलं आहे. चार किंवा पाच जून रोजी आयपीएलचा फायनल सामना होण्याची शक्यता आहे. चेन्नई संघाने आयपीएलच्या 14 व्या हंगामात जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदा स्पर्धेची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून होऊ शकते. चेन्नईसोबत कोणता संघ सलामीचा सामना खेळणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.


आयपीएलच्या 15 व्या हंगामाची लवकरच सुरुवात होईल, असं वक्तव्य बीसीसीआय सचिव जय शाह यांनी चेन्नईमधील एका कार्यक्रमात केलं होतं. ते म्हणाले होते की,  'मला माहितेय चेपॉक स्टेडिअमवर सर्वजण सामना पाहण्यास उत्सुक आहात. आता यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. या हंगामातील आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार आहेत. दोन नवीन संघ आल्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक झाली आहे. '


दरम्यान, गेल्या महिन्यात आरपीएसजी ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटलनं दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींचे मालकी हक्क विकत घेतले. आरपीएसजी ग्रुपने लखनौस्थित फ्रँचायझी 7,090 कोटी रुपयांना विकत घेतली. तर, सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी 5,166 कोटी रुपयांना विकत घेतली. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा 10 संघ लीगमध्ये खेळताना दिसतील. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबधित बातम्या :


IPL 2022 Auction: जुने संघ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतील, लखनौ आणि अहमदाबादला फायदा मिळणार
MS Dhoni On IPL: आयपीएलचा शेवटचा सामना कधी खेळणार? महेंद्रसिंह धोनी म्हणाला...