Ind vs Pak, Asia Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला आता काही दिवस शिल्लक असताना सोशल मीडियावर तर अगदी उत्साहाचं आण चुरशीचं वातावरण दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वकार युनूसच्या एका वक्तव्यामुळं ट्वीटरवर मजेशीर असं शाब्दिक युद्ध रंगल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी वकारनं पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) स्पर्धेत नसल्याचं भारतीय फलंदाजांना दिलासा मिळेल असं खोडकर वक्तव्य केलं. ज्यावर रिप्लाय देत इरफान पठाणनं “जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आशिया कपमध्ये खेळत नाहीत ही इतर संघांसाठी दिलासादायक गोष्ट आहे! असा टोला वकारला लगावला, दरम्यान आता या वक्तव्यांचा विचार करता खरचं दोन्ही संघांचे स्टार गोलंदाज स्पर्धेत नसल्यामुळे गोलंदाजीची धुरा कोणावर असू शकते हा प्रश्न समोर आहे.
आता भारतीय संघाचा विचार करता आजच्या तारखेला भारत अव्वल दर्जाचे दोन आंतरराष्ट्रीय संघ एकावेळी खेळवू शकतो, त्यामुळे बुमराह, पटेल नसतानाही भारताकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये बुमराह नसल्याने असणारी अनुभवाची कमतरता स्वींग किंग भुवनेश्वर कुमार भरुन काढू शकतो. त्यानंतर वेगवान अटॅकसाठी युवा गोलंदाजाची जोडी अर्शदीप सिंह आणि आवेश खान आहेच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी पाकिस्तानपेक्षा भारताकडे अधिक आणि ताकदवार आहे ती म्हणजे फिरकी गोलंदाजी. भारताचा रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई या टॉप फिरकीपटूंपैकी ज्यानांही संधी मिळेल ते या संधीचं नक्कीच सोनं करतील. या सर्वाशिवाय एक्स फॅक्टर म्हणून हार्दीक पांड्याची बोलिंग आहेच. त्यामुळे भारत एक पॉवरपॅक गोलंदाजी युनिट घेऊन मैदानात उतरेल यात शंका नाही.
दुसरीकडे पाकिस्तानचा विचार करता, शाहीन आफ्रिदीची अनुपस्थिती संघाची डोकेदुखी नक्कीच वाढवू शकते. पण संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या संघानुसार शाहीनसाठी त्यांनी नसीम शाह या 19 वर्षीय गोलंदाजाचा विचार केला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध नसीमच्या वेगापासून भारतीय फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहनवाज दहनी या मीडियम फास्ट बोलर्सचीही ताकद पाकिस्तानकडे आहे. तसंच शाहीनच्या जागी संधी देण्यात आलेला मोहम्मद हसनैन याच्याबद्दलही भारताला विचार करावा लागेल, कारण केवळ 19 वर्षीय मोहम्मदच्या गोलंदाजीत वेग आणि स्वींग दोन्ही असल्यानं त्याच्यापासून फलंदाजांना मोठा धोका आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजीची जबाबदारी शादाब खान आणि उस्मान कादिर यांच्याकडे असेल.
असा आहे संपूर्ण भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
असा आहे संपूर्ण पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-