Rahul Dravid Test COVID-19 Positive : आगामी आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळं तो या भव्य स्पर्धेत संघासोबत असेल की नाही? असा प्रश्न समोर येत असताना माजी कोच रवी शास्त्री यांनी राहुल द्रविड कधी संघासोबत परतणार याबाबत माहिती दिली आहे.


शास्त्री म्हणाले, "मला वाटत नाही की यामुळे अधिक फरक पडणार आहे, आता याला कोविड-19 म्हणत, असले तरी हा एक तापाचाच प्रकार आहे. तीन-चार दिवसांत तो बरा होईल आणि तो संघासोबत सामील होईल." ओव्हल येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान शास्त्री यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचा अनुभव सांगितला. कोविड-19 साठी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, सावधगिरीचा उपाय म्हणून गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना त्या वेळी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "गेल्या वर्षी जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मी सहा दिवसांनंतर मी बरा होऊन पुन्हा संघासोबत परतलो होतो.  त्यामुळे राहुलही नक्कीच संघासोबत परतेल.''


झिम्बाब्वे दौऱ्यात राहुल द्रविड विश्रांतीवर 


झिम्बाब्वे दौऱ्यात राहुल द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना विश्रांती देण्यात आली होती आणि तिघेही दुबईत भारताच्या आशिया चषक संघात सहभागी होणार होते. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. या मालिकेत भारतानं झिम्बाब्वेचा 3-0 नं विजय मिळवला. दरम्यान, आशिया चषकात भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यानं करणार आहे. यासाठी भारतीय संघ यूएईला रवाना होण्यापूर्वी राहुल द्रविड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय.


आशिया चषकाला 27 ऑगस्टपासून सुरुवात


आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. 


हे देखील वाचा-