Asia Cup 2022: आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या लढतीपूर्वी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचलीय. तसेच त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले. यातील पाच सामन्यांवर आपण नजर टाकुयात.
हरभजन-अख्तरचा वाद
आशिया कप 2010 च्या चौथ्या सामन्यात भारत- पाकिस्तान एकमेकांशी भिडले. प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं भारतासमोर 268 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून गौतम गंभीरनं 83 आणि महेंद्रसिंह धोनीनं 56 धावा केल्या. अखेरच्या षटकात सुरेश रैना (34 धावा) बाद झाल्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटताना दिसला. मात्र, हरभजननं मोहम्मद अमीरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हरभजननं अख्तरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. यानंतर पाकिस्तानचा हा गोलंदाज संतापला. त्याची हरभजनशी टक्कर झाली. भज्जीनंही अख्तरला त्याच्याच शैलीत उत्तर दिलं.
विराट कोहलीची संस्मरणीय खेळी
2012 मध्ये खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी संस्मरणीय ठरला. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 50 षटकात सहा विकेट्स गमावून 329 धावा केल्या. पाकिस्तानकडून नासिर जमशेदनं 112 आणि मोहम्मद हाफिजनं 105 धावांची तुफानी खेळी केली होती. ज्यामुळं भारताला विजयासाठी 330 धावांचं विशाल लक्ष्य मिळालं होतं. परंतु, विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं हा सामना 13 चेंडू शिल्लक असतानाच जिंकला. या सामन्यात विराट कोहलीनं 148 चेंडूत 183 धावांची खेळी केली होती. ज्यात 22 चौकार आणि दोन षटकांराचा समावेश होता. विराट व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर 52 आणि रोहित शर्मानं 68 धावांचं योगदान दिलं.
अखेरच्या षटकात शाहीद आफ्रिदीनं सामना फिरवला
2014 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं आठ विकेट्स गमावून 245 धावा केल्या. भारताकडून अंबाती रायुडूनं 58, रोहित शर्मानं 56 आणि रवींद्र जडेजानं नाबाद 52 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पण शाहिद आफ्रिदीनं अखेर षटकात सामना फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 10 धावा करायच्या होत्या. त्यावेळी कर्णधार धोनीनं रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी बोलावलं. अश्विनने पहिल्याच चेंडूवर अजमलला बाद केलं. भारत हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पंरतु पुढच्या चेंडूवर जुनैदनं एक धाव काढून आफ्रिदीला स्ट्राईक दिली. भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त एका विकेट्सची गरज होती. पण अखेरच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला सामना जिंकून दिला.
मोहम्मद आमिरची खतरनाक गोलंदाजी
आशिया कप 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने- सामने आले होते. त्यावेळी मोहम्मद आमिरनं खतरनाक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 17.3 षटकांत 83 धावांवर आटोपला. मात्र, 84 धावांचं लक्ष्य सोप वाटत असलं तरी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं भारतीय फलंदाजाच्या नाकी नऊ आणले होते. मोहम्मद अमीरनं पहिल्या दोन षटकांत भारताच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं. त्यानं पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माला शून्यावर बाद केलं. दुसऱ्याच षटकात सुरेश रैनालाही ( एक धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. कठीण परिस्थितीत पुन्हा कोहली भारतासाठी तारणहार ठरला. त्यानं 49 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.
शिखर-रोहितच्या जोडीचा धमाका
आशिया चषकाच्या मागच्या हंगामात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते. सुपर-4 सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवननं शानदार खेळी केली. दुबईत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 237 धावा केल्या. शोएब मलिकनं 78 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 63 चेंडू आणि नऊ विकेट्स राखून सामना जिंकला. शिखर धवननं 114 आणि रोहित शर्मानं नाबाद 111 धावांची खेळी केली.
हे देखील वाचा-