U19 World Cup 2024 : युवा खेळाडू दाखवणार उद्यापासून जलवा, पहिला सामना बांगलादेशविरोधात, पाहा A टू Z माहिती
U19 Indian Cricket Team, U19 World Cup 2024 : युवा भारतीय खेळाडूंची विश्वचषकाची मोहिम शनिवारपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरोधात होत आहे.
Icc u19 world cup 2024 Team India Schedule : अंडर १९ वर्ल्डकपच्या थराराला दक्षिण आफ्रिकामध्ये आजपासून सुरुवात झाली आहे. आज आयर्लंड आणि युनायटेड्स स्टेट्सच्या यांच्यातील सामन्याने विश्वचषकाला सुरुवात झाली. या स्पर्धेतून क्रिकेट जगताला अनेक मोठे स्टार्स मिळण्याच्या आशा आहेत. या स्पर्धेत 24 दिवसांत फायनलस एकूण 41 सामने खेळले जातील. शनिवारी भारताच्या युवा खेळाडूंची विश्वचषकाची मोहिम सुरु होत आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरोधात होत आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या युवा संघाच्या वेळापत्रकासंदर्भात आणि इतर सर्व माहिती जाणून घेऊयात...
भारताच्या ग्रुपमध्ये कोण कोण ?
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 16 संघाचा सहभाग आहे, या संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ असतील. भारतीय संघ अ ग्रुपमध्ये आहे. भारताच्या ग्रुपमध्ये आयर्लंड, युनायटेड स्टेट्स आणि बांगलादेश या संघाचा सहभाग आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाचे तीन सामने होणार आहे. 20 जानेवारी रोजी बांगलादेशविरोधात भारताचा युवा संघ दोन हात करणार आहे. दुसरा सामना 25 जानेवारी रोजी होणार आहे. तर 28 जानेवारी रोजी अखेरचा सामना होणार आहे. ग्रुप स्टेजनंतर सुपर 6 मध्ये भारतीय संघ खेळणार आहे. टीम इंडियाने 5 वेळा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे इतर संघांचे लक्ष भारताचे वर्चस्व मोडीत काढण्यावर असणार आहे.
अ गट- बांगलादेश, भारत, आयर्लंड, अमेरिका
ब गट - इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
क गट- ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे
ड गट- अफगाणिस्तान, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान
भारतीय संघाची धुरा कुणाच्या खांद्यावर ?
अंडर 19 विश्वचषकासाठी बीसीसीआयने 15 सदस्य संघाची घोषमा केली होती. उदय सहारण याच्याकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय या संघात मुंबईकडून खेळणारा सरफराज खानचा भाऊ मुशीर यालाही संधी मिळाली आहे. भारताचा कर्णधार उदय सहारण हा अंडर 16 पासून टॉप स्कोरर आहे. 2019-20 मध्ये झालेल्या अंडर-16 विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये उदय याने 13 डावात 49 च्या जबरदस्त सरासरीने 638 धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय 2022-23 मध्ये झालेल्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये 10 डावात 43 च्या सरासरीने 385 धावा चोपल्या होत्या.
अंडर-19 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय टीम
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौड़ा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.