नेपाळवर 10 विकेटने विजय, रोहित-गिलची दमदार अर्धशतके, भारताचा सुपर 4 मध्ये प्रवेश
Asia Cup 2023 : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेटने पराभव केला.
Asia Cup 2023 : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली.रोहित शर्माने नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने नाणफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 230 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ मैदानात उतरला पण तीन षटकांचा खेळ होण्याआधीच पावसाने विघ्न घातले. त्यामुळे सामना जवळपास दोन तास प्रभावित झाला. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. पण डकवर्थ लुईस नियमांनुसार, भारताला 23 षटकांत 145 धावांचे आव्हान देण्यात आले. पाऊस पडल्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी करणे कठीण जात होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीला दोन ते तीन षटके संयमी फलंदाजी केली. जम बसल्यानंतर भारताच्या सलामी जोडीने नेपाळची गोलंदाजांची पिटाई केली.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी नाबाद 147 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 59 चेंडूत 74 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने 5 गगनचुंबी षटकार आणि 6 खणखणीत चौकार लगावले. तर शुभमन गिल याने 62 चेंडूत 67 धावा चोपल्या. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता.
What a knock by the captain!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
74* in just 59 balls with 6 fours and 5 sixes. The Hitman played some excellent shots, a quality innings by Rohit! pic.twitter.com/9XqQ3HEqZp
भारतीय संघाने या विजयासह सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानसोबत 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. अ गटामध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 10 सप्टेंबर रोजी ग्रुप अ मधील आघाडीच्या दोन्ही संघामध्ये सामना होईल. 2 सप्टेंबर रोजी झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता रविवारी या दोन्ही संघामध्ये महामुकाबला होणार आहे.
India have qualified for the Super 4s.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
India will face Pakistan on Sunday in Round 2 of Asia Cup 2023....!!! pic.twitter.com/vXuaLiQvSt