IND vs SL, 3rd T20: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने तिसरा सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने धडाकेबाज असं सलग तिसरं अर्धशतक झळकावत सामना भारताला सहज जिंकवून दिला आहे. भारताने श्रीलंकेचं 147 धावाचं आव्हान 16.5 ओव्हरमध्ये संपवत सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजनंतर आता भारताने श्रीलंकेलाही व्हाईट वॉश दिला आहे.


सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चूकीचा ठरवत श्रीलंकेवर पहिल्या ओव्हरपासून भेदक गोलंदाजी करत त्यांचे एक-एक फलंदाज माघारी धाडले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने केवळ एकहाती झुंज देत 38 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकार करत 74 धावा केल्या. ज्यामुळे श्रीलंकेचा संघ किमान 146 धावा करु शकला. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. यावेळी आवेश खानने 2 तर सिराज, बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताचा कर्णधार रोहित स्वस्तात माघारी परतला. इतरही फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण युवा खेळाडू श्रेयस अय्यरने मात्र अप्रतिम फलंदाजी करत 45 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकार करत नाबाद 73 धावा झळकावल्या. ज्यामुळे भारताने 16.5 षटकात 4 गडी गमावत आव्हान पूर्ण करत सामना 6 विकेट्सनी जिंकला.


मालिकाही भारताच्या नावावर


तीन सामन्यांची टी20 मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवली गेली. यात पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. भारताने मालिकेतील पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दरम्यान यामुळे भारताने मालिका आधीच नावावर केली होती. पण आता तिसरा सामनाही 6 विकेट्सनी जिंकल्यामुळे भारताने श्रीलंकेला 3-0 ने व्हाईट वॉश दिला आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha