Ind Vs SL Asia Cup 2025: भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण
Ind Vs SL Asia Cup 2025: 58 चेंडूत 107 धावा कुटणारा श्रीलंकेचा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकेने इतकी मोठी चूक का केली?

Ind Vs SL Asia Cup 2025: आशिया चषक स्पर्धेतील निव्वळ औपचारिकता म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारत आणि श्रीलंका (Ind Vs SL) यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यामुळे क्रिकेट रसिकांना उच्चप्रतीचे क्रिकेट काय असते, हे अनुभवता आले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना दोन्ही संघाचे स्कोअर टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये गेला. या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने (Team India) संयमाने खेळ करत श्रीलंकेच्या (Srilanka) तोंडचा विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला. मात्र, सुपर ओव्हरमधील एक घोडचूक श्रीलंकेला प्रचंड महागात पडली. अन्यथा या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.
भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यावेळी भारतीय संघ हा सामना आरामात जिंकेल, असे वाटत होते. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. पहिल्याच षटकात श्रीलंकेचा पहिला गडी बाद झाला. तेव्हा श्रीलंका बॅकफूटवर गेली, असे वाटत होते. परंतु, श्रीलंकेच्या पथुम निसांका याने त्यानंतर मैदानावर धावांचा जो काही पाऊस पाडला, त्यानंतर भारतीय संघाने हा सामना गमावला, असेच सर्वांना वाटत होते. पथुम निसांका याने 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 58 चेंडूत 107 धावांची वादळी खेळी साकारली. पथुम निसांका याच्या बॅटवर आलेला जवळपास प्रत्येक चेंडू सीमापार जात होता. पथुम निसांका याला कसे आवरावे, हे एकाही भारतीय गोलंदाजाला समजले नाही. भारतीय गोलंदाज त्याच्यासमोर अक्षरश: हतबल झाले होते. अशी सगळी परिस्थिती असतानाही श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये टॉप फॉर्ममध्य असणाऱ्या पथुम निसांकाला मैदानात फलंदाजासीठी पाठवले नाही, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकेने मोक्याच्या क्षणी इतकी मोठी घोडचूक कशी केली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर आता समोर आले आहे. कालचा सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या याने या गोष्टीचा उलगडा केला.
दुर्दैवाने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पथुमा निसांका बाद झाला. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. सुपर ओव्हरमध्ये पथुम निसांका याला आम्ही फलंदाजीसाठी मैदानात पाठवले नाही कारण गेल्या दोन सामन्यांपासून त्याचे स्नायू दुखावले (Hamstring Injury) गेले होते. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता वाटत होती. त्यामुळेच आम्ही त्याला संपूर्ण 20 षटके फलंदाजी करुन थकल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये फलंदाजासाठी पाठवले नाही, असे सनथ जयसूर्याने सांगितले. पथुमा याने या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. दुर्दैवाने शेवटच्या षटकात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. परंतु, संपूर्ण सामन्यात 20 षटकांमध्ये त्याने शतक झळकावत श्रीलंकेला 202 धावांपर्यंत पोहोचवले, असेही जयसूर्याने म्हटले.
आणखी वाचा
श्रीलंकेचा शनाका आऊट की नॉट आऊट? सुपर ओव्हरमधला सुपर ड्रामा… पण नियम काय सांगतो?




















