IND vs SL, Innings Highlight: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने (Team India) श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला 20 षटकांत 137 धावांवर रोखत 62 धावांनी सामना जिंकला.

  



भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला आधी यावं लागलं. भारताकडून ईशान आणि रोहित या दोघांनी सुरुवातीपासून फटकेबाजी सुरु केली. ईशानने 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर रोहित मात्र अर्धशतकाजवळ पोहचत 44 धावांवर बाद झाला. ज्यानंतर श्रेयस आणि ईशानने डाव सांभाळला. ईशानने 56 चेंडूत 89 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर त्यानंतर श्रेयस अय्यर याने नाबाद 57 धावा लगावत धावसंख्या 199 पर्यंत पोहोचवली. ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांची गरज होती. यावेळी भारताने भेदक गोलंदाजी करत 20 षटकांत अवघ्या 137 धावांत श्रीलंकेला रोखलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 2 तर चहल आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर श्रीलंकेकडून चारित असालंका याने एकाकी झुंज देत नाबाद 53 धावा केल्या पण त्याला हवी तशी साथ न मिळाल्याने श्रीलंका 62 धावांनी पराभूत झाली. 


रोहितचा नवा विक्रम


आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आजच्या सामन्यातील 44 धावांमुळे 3 हजार 307 धावा जमा झाल्या असून या कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. रोहितने विराट आणि गप्टील यांना आज मागे टाकले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहितने 2 चौकार आणि एक षटकार लगावत 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 3 हजार 307 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने विराट आणि गप्टीलला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. विराटच्या नावावर 97 सामन्यांत 3 हजार 296 धावा असून गप्टीलच्या नावावर 112 सामन्यांत 3 हजार 299 धावा आहेत. रोहित या सामन्याआधी या दोघांच्या मागे तिसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या खेळीच्या जोरावर रोहितने पहिलं स्थान मिळवलं आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha