IND vs SCOT : भारताला 'विराट' विजयाची गरज, आज स्कॉटलँडसोबत सामना
IND vs SCOT, T20 world Cup 2021: टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना नवख्या स्कॉटलँड संघासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे.
IND vs SCOT, T20 world Cup 2021: टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना नवख्या स्कॉटलँड संघासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. त्यासोबतच अफगाणिस्तान-न्यूझीलंड या सामन्यावरही भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट अवलंबून आहे. भारत आणि स्कॉटलँड यांच्यात दुबईच्या मैदानावर सायंकाळी सामना होणार आहे. दुबईच्या मैदानावरील मागील दोन्ही सामने भारताने गमावलेले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केला होता.
भारत आणि स्कॉटलँड विश्वचषकातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. याआधी झालेल्या तीन सामन्यापैकी भारतीय संघाला दोन सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तर स्कॉटलँड संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. स्कॉटलँड संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यातीतूनही बाहेर गेला आहे. भारत स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच टी20 सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानविरोधातील विजयी भारतीय संघ कायम राहण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानवर 66 धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर विराट सेनेच्या नजरा ही गती कायम ठेवण्यावर असेल. स्कॉटलँ विरोधातील सामन्यात भारताला केवळ विजयाची नोंद करावी लागणार नाही तर नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि इतर संघांचे निकाल अनुकूल असतील अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचा रन रेट खूप घसरला होता. आता भारतासाठी प्रत्येक सामना करा किंवा मरा असा आहे. पाकिस्तानने सलग चार विजयांसह उपांत्य फेरी गाठली असून न्यूझीलंडही गट 2 मधून पात्र होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तसे, न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून हरले तर भारताच्या आशा पल्लवित होऊ शकतात. मात्र, भारतीय संघ आपल्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि संघाच्या नजरा स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावर आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरलेल्या भारताच्या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहित शर्माला पुन्हा सलामीला पाठवण्यात आले. त्यानेही शानदार अर्धशतक झळकावून आपला फॉर्म दाखवला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही निर्णय चुकीचे ठरल्याचे रोहितने सामन्यानंतर मान्य केले. रोहित, केएल राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगल्या धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवच्या आगमनाने फलंदाजी मजबूत झाली आहे. त्याच्याशिवाय खालच्या फळीत रवींद्र जडेजाही उपयुक्त ठरतो.