नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
IND vs SA, T20I WORLD CUP 2024 FINAL : नशिबाने रोहित शर्माची साथ देत नाणेफेकीचा कौल पारड्यात पाडला आहे. आता रोहितसेनेला आपलं काम चोख बजावत चषक उंचवायचा आहे.
IND vs SA, T20I WORLD CUP 2024 FINAL : बार्बाडोसच्या रणांगणात 2024 टी20 विश्वचषकाचा विजेता मिळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महाअंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत अर्धे काम फत्ते केले आहे. होय. टी20 विश्वचषक आणि नाणेफेक यासंदर्भातील भन्नाट योगायोग समोर आलाय. त्याबाबत जाणून घेऊयात...
2007 च्या टी20 विश्वचषकात काय झालं ?
2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानचा पराभव करत भारताने पहिल्या टी20 विश्वचषकावर नाव कोरले होते. पण त्यावेळी एमएस धोनीने नाणेफेक (In 2007 T20I WC final - India won the toss, Decided to bat first & won the match) जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करतना 157 धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 152 धावांवर रोखले होते. भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला होता. या सामन्यात रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावांची निर्णायक खेळी केली होती. 2024 टी20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. उपांत्य सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली होती. आजही रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 2024 टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. आता चषकही भारत उंचावणार का? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. 2024 आणि 2007 टी20 विश्वचषकाची फायनल खेळणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू ठरणार आहे.
दुसरा योगयोग कोणता ?
क्रिकेटमध्ये नाणेफेकीला विशेष महत्व आहे. त्यात फायनल असेल तर आणखी महत्व वाढते. फायनलमध्ये नाणेफेक जिंकून रोहित शर्माने अर्धी लढाई जिंकली आहे. होय.. कारण टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा वरचष्मा राहिलाय. 2010 पासून टी20 विश्वचषक फायनल सामन्याचा (Teams who have won the toss have won the match since 2010) इतिहास पाहिल्यास नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. 2010 पासून 2022 पर्यंत टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने चषकावर नाव कोरले आहेत. आज नशिबाने रोहित शर्माची साथ देत नाणेफेकीचा कौल पारड्यात पाडला आहे. आता रोहितसेनेला आपलं काम चोख बजावत चषक उंचवायचा आहे.
IN T20I WORLD CUP FINAL:
— Johns. (@CricCrazyJohns) June 29, 2024
Teams who have won the toss have won the match since 2010. 🔥 pic.twitter.com/2qyeu9a4fL
फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका :
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.