IND vs PAK T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात (ICC T20 World Cup 2024) रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) सामन्यात भारताचा 6 धावांनी विजय झाला. पाकिस्तान बाजी मारेल असं वाटत असताना भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी चोख भूमिका बजावली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका केली जात आहे. 


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या संघातील खेळाडू गेल्या 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे मी त्यांना काही शिकवू शकत नाही. जसप्रीत बुमराह विकेट घेण्यासाठीच गोलंदाजीसाठी आला होता, हे मोहम्मद रिझवानला माहिती नाही का?, बुमहार गोलंदाजीसाठी आल्यानंतर रिझवानने सावध राहायला हवे होते. मात्र मोठा फटका मारायला गेला आणि तो बाद झाला, इफ्तिखार अहमदने देखील हेच केले, असं वसीम अक्रम म्हणाला. 


पाकिस्तानच्या संघातील खेळाडू एकमेकांसोबत जास्त बोलत नाही. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे आणि तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात. या खेळाडूंना घरी बसवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज भासत नाही. कारण की ते स्वत:च त्यांचे शत्रू आहेत. भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडे खूप वेळ होता पण त्यांना ते जमले नाही. पाकिस्तानी संघाकडे कोणती रणनीतीच नसल्याने पराभव स्वीकारावा लागला, असंही वसीम अक्रमने सांगितले.


शेवटच्या दोन षटकांत थरार-


पाकिस्तानला विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. जसप्रीत बुमराहने 19 वे आणि अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले. 19 व्या षटकांत बुमराहने एक विकेट्स घेत फक्त 3 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीपने पहिल्याच चेंडूत इमाद वसीमला बाद केले. यानंतर नसीम शाहने आक्रमक फटकेबाजी करत दोन चौकार लगावले, पण अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर तोही अपयशी ठरला. अर्शदीपने 20 व्या षटकांत 11 धावा देत एक विकेट्स घेतली. 


पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला


टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर


T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र


T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video