T20 World Cup 2024 Ind vs Pak: कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने शानदार खेळ करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 धावांनी नमवले. (T20 World Cup 2024) यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारताने पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.


पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.


शेवटच्या दोन षटकांत थरार-


पाकिस्तानला विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. जसप्रीत बुमराहने 19 वे आणि अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले. 19 व्या षटकांत बुमराहने एक विकेट्स घेत फक्त 3 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीपने पहिल्याच चेंडूत इमाद वसीमला बाद केले. यानंतर नसीम शाहने आक्रमक फटकेबाजी करत दोन चौकार लगावले, पण अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर तोही अपयशी ठरला. अर्शदीपने 20 व्या षटकांत 11 धावा देत एक विकेट्स घेतली. 






पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला


टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.


विराट कोहली पहिल्यांदाच ठरला अपयशी 


याआधी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्या डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही त्यातही तो 36 धावांवर नाबाद राहिला. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.


संबंधित बातमी:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र