मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (MCA President Amol Kale) यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर गेले होते. त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघांत रविवारी खेळवण्यात आलेला सामनाही पाहिल्याची माहिती आहे.


एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन


मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अमोल काळे टी-20 विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी रविवारी झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. अमोल काळे यांनी एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सूरज सामत यांच्यासह रविवारी स्टेडियममधून टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा थरारक विजय पाहिला.


2022 मध्ये अमोल काळे यांची MCA अध्यक्षपदी निवड


ऑक्टोबर 2022 मध्ये अमोल काळे यांची MCA अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी विश्वचषक चॅम्पियन संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात अध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत होती, मात्र नंतर अमोर काळे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अमोल काळे यांनी खेळांडूसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यातीलच एक म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ पुरुषांची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय. आगामी मोसमापासून मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार आहे. 


अमोल काळे यांची कारकीर्द


अमोल काळे यांचा जन्म नागपूरचा. मूळचे नागपूरचे असलेले अमोल काळे हे एक दशकाहून अधिक काळ मुंबईत स्थायिक होते आणि त्यांनी विविध व्यवसायात नशीब आजमावलं आणि यशही मिळवलं. MCA च्या कारभाराचे नेतृत्व करण्याबरोबरच, अमोल काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सह-प्रवर्तक (Co-Promoter) देखील होते. या वर्षाच्या सुरुवातीला टेनिस-बॉल फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुरु करण्यात आली होती.