(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK : भारत-पाकिस्तानचा कोलंबोत थरार, पाऊस व्हिलन ठरणार का? पाहा हवामानाची लेटस्ट अपडेट
India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे.
India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असीतल. या दोघांमधील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता सुपर 4 च्या सामन्यावरही पावसाचे संकट आहे. पण चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
कोलंबोमध्ये रविवारच्या दिवसाची सुरुवातच पावसाने होऊ शकते, असा अंदाज आहे. कोलंबोमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे खेळाडूंनी इनडोअर सराव केला. पावसाचं संकट पाहाता एसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. हमानाच्या अंदाजानुसार, कोलंबोमध्ये रविवारी दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिवसभर सरासरी 70 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे तापमानात घट होईल. सकाळी कोलंबोमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. सामन्यादरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.
पहिल्या सामन्यात काय झाले होते.. ?
शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय.