IND vs ENG : काही दिवसांत भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचं पारड जड मानलं जात आहे. अशातच इंग्लंडच्या माजी क्रिकेटरने देखील भविष्यवाणी करत टीम इंडिया इंग्लंडवर भारी पडू शकते असं म्हटलं आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर डेविड लॉयडने भारत ही सीरिज 4-0 किंवा 3-0 ने जिंकू शकतो, असं म्हटलं आहे.


डेविड लॉयडने बोलताना सांगितलं की, "टीम इंडियाचं पार या मालिकेत जड असणार आहे. परंतु, इंग्लंडसाठीही हे चांगलं असणार आहे. श्रीलंकेच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याचा फायदा इंग्लंडच्या संघाला नक्कीच मिळेल. कारण भारतात जवळपास तशीच परिस्थिती असेल. या मालिकेत मला कुणावरही पैज लावण्याची इच्छा असल्यास ती टीम इंडिया असेल."


मालिकेसंदर्भात अंदाज बांधताना इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला विजयी घोषित केलं. तो म्हणाला की, "मला वाटतं की, कोणत्याही किंतु परंतु शिवाय भारतीय संघ विजयी होईल. टीम इंडिया मालिका 3-0 किंवा 4-0 ने जिंकू शकते. परंतु, जर मी चुकीचा ठरलो तर मला खरंच खूप आनंद होईल."


IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?


दरम्यान, भारतीय संघ या फरकाने इंग्लंडविरोधातील मालिका जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचेल. भारतीय क्रिकेट संघाने जर इंग्लंडला 2-0, किंवा 3-0 अशा फरकाने हरवलं, तर भारताचं फायनलचं तिकिट पक्कं होईल. तसेच जर इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर टीम इंडियाला 4-0 किंवा 3-0 ने मात द्यावी लागेल.


टीम इंडिया आणि टीम इंग्लंड दोन्ही संघांनी आपले याआधीचे कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच मायदेशात 2-0 अशा फरकाने मात देत मालिका खिशात घातली. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात 2-1 अशा फराकने मात दिली.


महत्त्वाच्या बातम्या :