मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी खेळाडू हे आजही सातत्यानं सक्रिय संघाला मार्गदर्शन करत असतात. अशाच काही खेळाडूंपैकी एक नाव म्हणजे राहुल द्रविड. ‘The wall’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडची क्रीडारसिकांनी त्याच्या संयमी खेळीसाठी कायमच प्रशंसा केली. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणे याच्यामध्येही हीच शैली पाहायला मिळाली.


Video | पर्वतरांगांच्या कुशीत दडलेलं 'हे' क्रिकेट स्टेडियम वेधतंय क्रीडारसिकांचं लक्ष


द्रविड हा स्वत: अंडर 19 खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ओळखला जातो. अशा या द्रविडनं अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी एक अजबच सल्ला दिल्याचं आता उघड होत आहे. खुद्द रहाणेनं नुकत्याच एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली. हर्षा भोगले यांना दिलेल्या मुलाखतीतत त्यानं ही बाब सांगितली. नेट्समध्ये फार काळासाठी फलंदाजी न करण्याचा सल्ला अजिंक्यला द्रविडनं दिला.


राहुल द्रविडनं अजिंक्यला नेमका कोणता कानमंत्र दिला?


'राहुल भाईनं मला मालिकेपूर्वी फोन केला. दुबईहून ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी त्यांचा फोन आला होता. कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नकोस. मला ठाऊक आहे, पहिल्या कसोटीनंतर तू संघाचं नेतृत्त्व करणार आहेस. त्यामुळं कशाचीही काळजी करु नकोस. फक्त मानसिकदृष्ट्या बळकट राहा. नेट्समध्ये फार काळासाठी फलंदाजी करु नकोस', असं ते म्हणाल्याचं अजिंक्यनं सांगितलं.





खरंतर द्रविडनं स्वत: केलेल्या चुकीतून शिकतच हा सल्ला अजिंक्यला दिला होता. त्यामुळं त्यानं अजिंक्यला त्याच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत त्याच्यामधील आत्मविश्वासाला आणखी प्रेरणा दिली. एक कर्णधार म्हणून येणारं दडपण द्रविड जाणतो आणि त्यानं हिच बाब हेरत अजिंक्यला हा मोलाचा सल्ला दिला. मुख्य म्हणजे अजिंक्यसाठी त्याचा हा सल्ला खऱ्या अर्थानं फायद्याचा ठरला असं म्हणायला हरकत नाही. कारण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाची दमदार कामगिरीच हे सारंकाही स्पष्ट सांगून जाते.