नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ नुकताच परतला आहे. सध्या संघातील बहुतेक फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. भारतात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना कठोर संघर्ष करावा लागेल, असे माजी भारतीय क्रिकेटपटूचे म्हणणे आहे. खरंतर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना सध्या श्रीलंकेबरोबर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळू शकलेली नाही आणि यामुळे भारतात विकेट घेण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


इंग्लंडचे फिरकीपटू भारतात यशस्वी होईल, असे वाटत नसल्याचे भारताचे माजी स्पिनर मनिंदर सिंह यांनी म्हटले आहे. मनिंदर म्हणाले, की "मला खात्री आहे की इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरणार नाही. भारतीय खेळपट्ट्यावर इंग्लंडचे फिरकीपट्टू चालणार नाही. ते चांगल्या विकेट्सवर गोलंदाजी करताक. टर्निंग खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्यासाठी वेगळं कौशल्य लागतं आणि ही एक कला देखील आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांची लाईन आणि लेंथ वेगळी असते आणि त्यानुसार ताळमाळ ठेवणे सोपं नाही."


पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.


कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात




  • पहिला सामना: 5-9 फेब्रुवारी (चेन्नई)

  • दुसरा सामना: 13-17 फेब्रुवारी (चेन्नई)

  • तिसरा सामना: 24-28 फेब्रुवारी (अहमदाबाद)

  • चौथा सामना: 4-8 मार्च (अहमदाबाद)

  • टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादमध्ये


भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी -20 मालिका देखील खेळणार आहे. सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. पहिला सामना 12 मार्च, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना 18 मार्च आणि शेवटचा सामना 20 मार्चला होईल. सध्या टी -20 साठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे.


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक




  • पहिला सामना: 23 मार्च (पुणे)

  • दुसरा सामना: 26 मार्च (पुणे)

  • तिसरा सामना: 28 मार्च (पुणे)