साहेबांना फिरकी रोखणार का? भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून कसोटीचा थरार
कसोटी क्रिकेटमधील दोन बलाढ्या संघातील लढतीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे असेल. आर. अश्विन, रवींद्र जाडेजा अन् अक्षर पटेल यांचं आक्रमक साहेबांच्या बॅझबॉलला कसं प्रतुत्तर देतात, हे पाहण क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असेल.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ( Ind vs Eng 1st Test ) पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) दोन्ही संघ (England vs India) भिडणार आहे. भारताने मागील 12 वर्षांत भारतामध्ये एकही कसोटी मालिका गमावलेली नाही, तर दुसरीकडे बॅझबॉल या अतिआक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकणारा इंग्लंडचा संघ असेल. कसोटी क्रिकेटमधील दोन बलाढ्या संघातील लढतीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे असेल. आर. अश्विन, रवींद्र जाडेजा अन् अक्षर पटेल यांचं आक्रमक साहेबांच्या बॅझबॉलला कसं प्रतुत्तर देतात, हे पाहण क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असेल.
त्रिकुटाचं योगदान भारतासाठी महत्वाचं -
भारताने मायदेशात 2012 मध्ये कसोटी मालिकेत पराभव पाहिला होता. त्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या कालावधीत भारताने मायदेशात सलग 16 कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली आहे. 12 वर्षांत भारताने 44 कसोटी सामन्यात फक्त तीन गमावले आहेत. मायदेशातील भारताच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं आव्हान बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघापुढे असेल. मायदेशात भारतीय संघाच्या यशाचं प्रमुख कारण अश्विन आणि जाडेजा ही फिरकीजी जोडी आहे. या जोडीने 500 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. या जोडीला आता अक्षर पटेलचीही साथ मिळाली आहे. या तीन अष्टपैलू खेळाडूंमुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होती. तळाला हे तिन्ही फलंदाज उपयुक्त योगदान देतात. त्यामुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत या त्रिकुटांचं योगदान भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
हैदराबादची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी -
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम फिरकीला साथ देणारं असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. इंग्लंडने आपल्या संघात चार फिरकी गोलंदाजांना स्थान दिलेय. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह उतरण्याची शक्यता आहे. रविंद्र जाडेजा आणि अश्विन यांचं स्थान निश्चित आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये स्पर्धा असेल.
रोहितवर भारताच्या फलंदाजीची भिस्त -
अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दोन कसोटीतून माघार घेतल्यामुळे भारताच्या फलंदाजीची भिस्त आता रोहित शर्मावर असेल. रोहित शर्मा यशस्वी जायस्वालच्या साथीने डावाची सुरुवात करेल. त्यानंतर शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मधल्या फळीमध्ये असतील. केएस भरत याला विकेटकिपर म्हणून संधी मिळू शकते. तर रविंद्र जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर लोअर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल.
इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली. इंग्लंडच्या संघात एकच प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या जोडीला कर्णधार बेन स्टोक्स असेल. चार फिरकी गोलंदाजाह इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
केएल राहुल ऐवजी केएस भरत की ध्रुव जुरेल, विकेटकिपर कोण, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार?