Ind vs Ban 1st T20 : गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन! 5 नंबरला खेळणारा खेळाडू करणार ओपनिंग? जाणून घ्या भारताची प्लेइंग-11
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची नजर टी-20 मालिका खिशात घालण्यावर असणार आहे.
India vs Bangladesh 1st T20 : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची नजर टी-20 मालिका खिशात घालण्यावर असणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने 13 जिंकले आहेत. तर बांगलादेश संघ केवळ एकच जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे. पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर येथे खेळला जाणार आहे.
संजू सॅमसनला मिळणार सलामीची जबाबदारी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून सलामीची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन बजावू शकतात. या दोन्ही खेळाडूंनी याआधीच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सलामी दिली आहे. अभिषेकने भारतासाठी 2 टी-20 सामन्यात सलामी करताना 100 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. तर संजू सॅमसनने 5 टी-20 सामन्यात सलामी करताना 77 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षकाची जबाबदारीही संजूकडे दिली जाऊ शकते.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही मिळणार संधी?
कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. सूर्या गेल्या काही दिवसापासून टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करत आहे. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. रायन परागला चौथ्या क्रमांकावर तर माजी कर्णधार हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. रिंकू सिंगला फिनिशरची भूमिका मिळू शकते. रिंकू डेथ ओव्हर्समध्ये तुफानी फलंदाजी करण्यात पटाईत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये शिवम दुबेलाही संधी मिळू शकते.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग सांभाळताना दिसणार आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. त्याला साथ देण्यासाठी हर्षित राणा किंवा मयंक यादव यांना संघात संधी मिळू शकते. या दोघांनी अद्याप भारतीय संघासाठी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांना फिरकी विभागात स्थान मिळू शकते.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.