(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washington Sundar : भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या नावामागची गोष्ट
सिडनी कसोटीत दुखापतग्रस्त ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जागी सुंदरला सामन्यात संधी देण्यात आली आहे. सुंदर भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 301 वा खेळाडू ठऱला आहे.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर आजपासून कसोटी मालिकेच्या चौथा आणि निर्णायक सामन्याला सुरुवात झाली. आजच्या सामन्याच वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सिडनी कसोटीत दुखापतग्रस्त ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जागी सुंदरला सामन्यात संधी देण्यात आली आहे. सुंदर भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 301 वा खेळाडू ठऱला आहे. वॉशिंग्टन सुंदर नाव काहीसं युनिक आहे. त्यामुळे असं नाव का असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र या नावामागेही एक कारण आहे.
वॉशिंग्टन सुंदर नावाच्या मागे एक अतिशय मनोरंजक किस्सा देखील आहे. त्याचे वडील एम सुंदर यांनी आपल्या गॉडफादर पीडी वॉशिंग्टनच्या नावावरुन मुलाचं नावात वॉशिंग्टन हा शब्द जोडला आहे. पीडी वॉशिंग्टन यांनी एम सुंदर यांना कुटुंबातील कठीण काळात खूप मदत केली होती. प्रत्येक कठीण वेळी, ते त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिले. यामुळेच ते त्यांना आपले गॉडफादर मानत असत. म्हणून त्यावरुन त्यांनी मुलांचं नाव वॉशिंग्टन ठेवलं.
वॉशिंग्टन सुंदरचा जर्सी क्रमांकही विशेष
वॉशिंग्टन सुंदर पार्थिव पटेलनंतर टीम इंडियाच्या वतीने पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. सुंदरने भारतीय संघात 18 वर्ष 69 दिवसात टीम इंडियामध्ये पदार्पण केले तर पार्थिव पटेलने 17 वर्ष 301 दिवसांत संघात पदार्पण केले होते. भारतीय संघात समावेश होण्याआधीपासून सुंदर नेहमी 55 नंबरची जर्सी घालत आला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुंदरने म्हटले होते की, त्याची जन्मतारीख आणि जन्माची वेळ हे यामागचं सर्वात मोठे कारण आहे. वॉशिंग्टन सुंदरचा जन्म 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.45 वाजता झाला आहे. हेच कारण आहे की 55 क्रमांकाची जर्सी घालून तो क्रिकेट खेळू लागला.